छत्रपती संभाजीनगर : मद्यधुंद अवस्थेत लष्करी जवानाने छावणी पोलिस ठाण्याच्या उपनिरीक्षकाला मारहाण करून गणवेश फाडून सेवा पदक तोडले. एवढ्यावर न थांबता इतर कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करून मिरवणुकीत वाहन घुसवण्याचा प्रयत्न केला. छावणी पोलिसांनी तत्काळ त्याला अटक केली. दीपक बबन गवई (३४, रा. पेठेनगर) असे त्याचे नाव असून न्यायालयाने त्याची हर्सूल कारागृहात रवानगी केली.
अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त छावणी नंदनवन कॉलनी परिसरात मिरवणुका येत असल्याने निरीक्षक कैलास देशमाने, उपनिरीक्षक पुंडलिक डाके हे सहकाऱ्यांसह वाहतुकीचे नियोजन करत होते. यावेळी नंदनवन कॉलनीतून अचानक बुलेटस्वार भरधाव वेगात येऊन रॅलीमध्ये घुसला. पोलिसांनी धाव घेत त्याला जमावातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याने अचानक डाके यांच्यावर धावून जात ‘मी आर्मी मॅन आहे, मला कायदा शिकवू नका’ असे म्हणून त्यांना मारहाण केली. त्यांचा गणवेश फाडून पदकही तोडले. त्यानंतर अंमलदार सुमेध पवार व इतरांनी त्याला बाजूला करण्याचा प्रयत्न करताच त्यांच्यावरही तो धावून गेला. लोकांनी त्याला पकडले. त्यानंतरही त्याने ‘मी तुम्हाला सोडणार नाही’, अशी पोलिसांना धमकी दिली.
विनयभंगाचे कलम वाढवलेदीपकला लोक आवरण्याचा प्रयत्न करत असताना तो प्रत्येकावर धावून जात होता. देशमाने यांनी तत्काळ त्याला घाटीत नेत तपासणी केली असता तो दारू प्यायल्याचे आढळले. त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली. बुधवारी त्यात विनयभंगाचे देखील कलम वाढवल्याचे त्यांनी सांगितले. दीपक पूँछ येथे नाईकपदी कर्तव्यावर आहे. भावाच्या सेवानिवृत्तीनिमित्त तो सुटीवर आला होता. या घटनेत डाके जबर जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.