छत्रपती संभाजीनगर : जिल्हा मुद्रांक कार्यालयात बोगस आधार कार्डाच्या आधारे चिकलठाण्यातील लाखो रुपये किमतीच्या भूखंडाचा दोनदा रजिस्ट्रीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर मुद्रांक विभागात खळबळ उडाली आहे.
आधार लिंकचे सर्व्हर डाऊन झाल्याच्या काळात विभागाने सदरील कारनामा केल्याची चर्चा आहे. आधारचे सर्व्हर महिन्यांतून किमान चार ते पाच दिवस डाउन होते. त्यामुळे रजिस्ट्री करताना आधार लिंक होत नाही. परिणामी, याचा फायदा घेत दुय्यम निबंधक बोगस नोंदण्यांसह तुकडा बंदीच्या रजिस्ट्रीचा धुमाकूळ सुरू असल्याची चर्चा आहे. बनावट आधार कार्डच्या आधारे एकाच भूखंडाची रजिस्ट्री या मथळ्याखाली ‘लोकमत’ने २२ जुलैच्या अंकात वृत्त प्रकाशित केल्यानंतर मुद्रांक विभागात दिवसभर धावपळ सुरू होती. आधारचे सर्व्हर डाउन झाल्यामुळे हा प्रकार घडल्याची सारवासारव विभागाकडून करण्यात आली.
चिकलठाण्यातील गट नं. ३६८ मधील ९ हजार ३७२ चौ. फूट भूखंडाची विक्री मार्चमध्ये जालन्यातील मूळ मालकाने करून दुय्यम निबंधक कार्यालय क्र. ३ मध्ये रजिस्ट्री करून दिली. रजिस्ट्रीनंतर सातबाऱ्यावर नाव घेण्यासाठी चिकलठाणा तलाठी सजा येथे अर्ज केला; परंतु मूळ मालकाच्या नावे दुसरी रजिस्ट्री क्रमांक ३५००/२०२४ ही ३१ मे रोजी झाली असून, सातबाऱ्यावर पहिल्या व्यवहारातील नाव घेऊ नये, असा अर्ज आल्याचे उघडकीस आले. मूळ मालकाने स्वत: विकलेल्या मालमत्तेची अडीच महिन्यांनंतर ३० लाख रुपयांत विक्रीची रजिस्ट्री झाल्याने मुद्रांक विभागात दुय्यम निबंधक, दलाल, नोटीस पाठविणाऱ्या यंत्रणेचे मोठे रॅकेट यामागे असून चौकशीची मागणी होत आहे.
सर्व्हर डाउनच्या आडून किती नोंदी?आधारचे सर्व्हर डाऊन असल्याचे सांगून काही महिन्यांत अनेक रजिस्ट्री करण्यात आल्या असून त्या रेकॉर्डवर आहेत की नाही, यावरून मुद्रांक विभागात उलटसुलट चर्चा सुरू होती. यावर कार्यालयाचे प्रमुख काहीही उत्तर देण्यास तयार नाहीत. कार्यालयातील संगणकाऐवजी दुसऱ्या संगणकाचा वापर करूनही काही दस्त नोंदणी झाल्याची माहिती सूत्रांकडून समजली.
उपमहानिरीक्षक ‘नॉट रिचेबल’मुद्रांक विभागाचे उपमहानिरीक्षक विजय भालेराव यांना विचारले असता त्यांनी ‘नंतर फोन करतो’ असे उत्तर देऊन सुरुवातीला व्यस्त असल्याचे सांगितले. काही वेळाने फोन ‘नॉट रिचेबल’ होता.
चौकशी करणारजिल्हा मुद्रांक अधिकारी विवेक गांगुर्डे हे मुंबईला बैठकीसाठी होते. मुंबईतून परतल्यावर या प्रकरणाची माहिती घेऊन चौकशी करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.