छत्रपती संभाजीनगर: मुलीची छेड काढून त्याचा जाब विचारण्यास गेलेल्या कुटुंबियांवर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना वाळूज भागातील जोगेश्वरी येथे बुधवारी घडली. मुलगी तिचे आई-वडील, बहीण यांना टोळक्याने बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अल्पवयीन मुलगी, आई, वडील, भाऊ व बहिणीसह जोगेश्वरी येथे भाड्याच्या घरात राहतात. आई, वडील खासगी नोकरी करतात. मंगळवारी (दि. ४) रोजी नववीच्या वर्गात शिक्षण घेणारी अल्पवयीन मुलगी शाळेतून घरी येत होती. त्यावेळी आरोपी नीलेश दुबिले, ऋषीकेश दुबिले, प्रतीक राजपूत यांनी तिला अश्लील हातवारे करीत तिचा पाठलाग करत असल्याचे तिने घरी आल्यानंतर सांगितले. तिची आई घराबाहेर आली असता तिघेही पळून गेले. बुधवारी (दि. ५) रोजी अंदाजे ५:३० वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलगी घराचा ओटा झाडत असताना नीलेश दुबिले, ऋषीकेश दुबिले, प्रतीक राजपूत यांनी तिला पाहून आवाज दिला व तिच्या मनात लज्जा वाटेल असे कृत्य केले.
जाब विचारणा करताच कुटुंबाला मारहाणयाबाबत मुलीच्या कुटुंबाने जाब विचारला असता, टोळक्याने शिवीगाळ करत लाकडी दांड्याने तसेच जे हातात येईल त्याने पीडित मुलीच्या आईला छातीवर लाथेने व डोक्यात काहीतरी मारून जखमी केले. वडिलांनाही ते तिघे मारत असताना तेथे प्रवीण डिगंबर काजळे, कृष्णा काजळे, सतीश काजळे हे भांडण सोडवण्यास आले, तेव्हा त्या तिघांनाही हाताचापटाने मारहाण करून शिवीगाळ केली. त्या तिघांसोबत आणखी काही मुले असण्याचा संशय आहे. कारण मारहाण करीत असताना तेथे लोकांची गर्दी झाली होती. याप्रकरणी ३९ वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात आरोपी नीलेश दुबिले, ऋषीकेश दुबिले, प्रतीक राजपूत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.