छत्रपती संभाजीनगर : शहरातील बड्या बांधकाम साईटची दिवसा रेकी करून रात्री तेथील लाखोंचे साहित्य चोरणारी टोळी दाेन अल्पवयीन मुलेच चालवत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्या दोघांसह त्यांचा साथीदार तुषार संतोष दाभाडे (२१,रा.कमळापूर) याला सातारा पोलिसांनी अटक करत २ लाख ६१ हजारांचे साहित्य जप्त केले.
गेल्या काही महिन्यांपासून शहरात बांधकाम साहित्य चोरीला जाण्याच्या घटनांत वाढ झाली होती. पुरूषोत्तम लक्ष्मण सरोदे (४१, रा. गोलवाडी), मनोज सर्जेराव तिडके (४६, रा. एन-९) व मानसून राजकुमार सवाईवाला (२४, रा. निराला बाजार) या तिघांच्या साईटवरून लाखोंचे साहित्य चोरीला गेले होते. सातारा पोलिस ठाण्याचे निरीक्षक संग्राम ताटे यांना बुधवारी चोरीचे बांधकाम साहित्य विकण्यासाठी दोन अल्पवयीन मुलांनी संपर्क करून ए.एस.क्लब जवळ ते विकण्यासाठी येत असल्याची माहिती प्राप्त झाली होती. ताटे यांच्या सूचनेवरून उपनिरीक्षक नंदकुमार भंडारे यांनी गुरुवारी सापळा रचला. तुषार व दोघे अल्पवयीन तेथे येताच तिघांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत तिघांनी चोरीची कबुली दिली. सहायक फौजदार अनिलकुमार सातदिवे, मनोज अकोले, दिगंबर राठोड, रज्जाक शेख, जगदीश खंडाळकर, रवींद्र राऊत यांनी कारवाई केली.
वडिलांच्या टेम्पोचा वापरदोन्ही अल्पवयीन मुले परराज्यातील असून कामाच्या शोधात काही वर्षांपूर्वी वाळुजमध्ये स्थायिक झाले. एकाचे वडील दिवसभर टेम्पो चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. ही टोळी दिवसभर शहर, वाळूजमध्ये रेकी करते. रात्री हा टेम्पो काढून साहित्य चोरून नेतात. वाळुजचा गुन्हेगार रामदास खाटोड त्यांच्या टोळीत सहभागी असल्याची कबुली त्यांनी दिली. तो मात्र पसार झाला आहे. साहित्य विकून दोन्ही अल्पवयीन मुलांनी मुंबईला जाऊन पैसे उडवल्याचे पोलिसांना सांगितले.