छत्रपती संभाजीनगर : शेंद्रा परिसर व अजिंठा परिसरात गॅरेज व स्पेअर पार्टसची दुकाने फोडून लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेणाऱ्या टोळीच्या दोन सदस्यांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. दोन दिवस मालेगावमध्ये मुक्काम ठोकत वेशांतर करून आसिफ इकबाल शेख अहमद (३०), मुजसीर अहमद जमीर अहमद (२८, दोघेही रा. मालेगाव) यांच्या मुसक्या आवळल्या. यात त्यांचे अन्य साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले.
प्रकाश कचकुरे (रा. करमाड) यांचे शेंद्रा परिसरात संकल्प सेल्स कॉर्पोरेशन नावाने वाहनांच्या स्पेअर पार्टस विक्रीचे दुकान आहे. १८ फेब्रुवारी रोजी रात्रीतून शटर उचकटून चोरांनी दुकानातील ९३ ग्रीसच्या बकेट, संगणक, प्रिंटर, चहा/काॅफी मशीन असे साहित्य नेले होते. त्यानंतर २३ फेब्रुवारी रेाजी अशाच प्रकारे अजिंठा परिसरातील शिवना येथील महाराष्ट्र ऑटो पार्टस व गॅरेजचे दुकान फोडून चोरांनी ऑइल गॅलन, बॉल जॉइंट रॅक, टायर रॉड, क्रॉम किट, शॉकअप, गॅस किट इ. साहित्य चोरून नेले होते. पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सतीश वाघ, उपनिरीक्षक विजय जाधव यांनी तपास सुरू केला.
वाघ व जाधव यांना तांत्रिक तपासात सदर चोरी करणारी टाेळी नाशिक भागात गेल्याचे धागेदोरे हाती लागले. जाधव तत्काळ सहकाऱ्यांसह मालेगावच्या दिशेने रवाना झाले. जवळपास २ ते ३ दिवस त्यांनी चोरांचा कसून शोध घेतला. अनेकदा बाजारपेठेत वेशांतर करून चौकशी करत चोरांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला.
यात चोर रमजानपुऱ्यातील असल्याची माहिती मिळाली. मध्यरात्री १२ वाजता पथकाने थेट गोडाऊनवर छापा टाकला. संशय येताच दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून चोरी केलेला १२ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अंमलदार शेख कासम, गोपाल पाटील, विठ्ठल डोके, नरेंद्र खंदारे, योगेश तरमळे, संजय तांदळे यांनी ही कारवाई केली.