औरंगाबाद : पहिल्या दोन मुली असल्यामुळे तिसऱ्यांदा गर्भ राहिल्यामुळे एका ठिकाणी लिंगनिदान चाचणी केली. त्यात पुन्हा तिसऱ्यांदा मुलगीच असल्याचे आढळले. त्यामुळे महिलेचा होनाजीनगर येथील एका फ्लॅटमध्ये डॉक्टर व परिचारिकेने अनधिकृतपणे गर्भपात केला. घरी गेल्यानंतर महिलेस प्रकृती बिघडल्यामुळे घाटीत दाखल केले. उपचार सुरू असताना महिलेचा १२ ऑक्टोबर २०२२ रोजी मृत्यू झाला. या प्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात डॉक्टरासह परिचारिकेवर २२ फेब्रुवारी २०२३ रोजी गुन्हा नोंदविल्याची माहिती निरीक्षक विठ्ठल पोटे यांनी दिली.
तारा सुनील शेळके (रा. धोपटेश्वर, ता. औरंगाबाद) असे मृत महिलेचे नाव आहे. डॉ. शाम जैस्वाल, परिचारिका सविता सोमनाथ थोरात अशी आरोपींची नावे आहेत. मृत तारा यांच्या जाऊ मीना शेळके यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, तारा यांना दिवस गेले होते. तिने सोनाेग्राफी करीत लिंगनिदान चाचणी केली. त्यात तिला मुलीचा गर्भ असल्याचे समजले. त्यामुळे ९ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी १० वाजता तारा ही पोटात दुखत असल्यामुळे तिच्या माहितीच्या डॉ. जैस्वाल याच्याकडे जायचे असल्याचे सांगून पती सुनील शेळकेसोबत राधास्वामी कॉलनी येथे आली. सोबत जाऊ होती. त्या तिघांना घेऊन एक महिला होनाजीनगर येथील आदित्य अपार्टमेंटमधील फ्लॅट क्र. ५ मध्ये गेले. आतमध्ये गेल्यानंतर पती व फिर्यादीला बाहेर हॉलमध्ये बसवून एक तरुणी ताराला घेऊन आतमध्ये गेली. त्या महिलेने ताराला गोळ्या दिल्या. पोटात दुखत असल्याने दवाखान्यात जायचे होते, त्याचे काय झाले, असे नातेवाइकांनी विचारले असता ताराने सांगितले, या सविता नर्स आहेत. त्यांना पोटाचे दुखणे चांगले समजते. त्यामुळे सर्वजण गप्प राहिले. सविताने ताराला बेडरूममध्ये एका पलंगावर झोपविले व लवकरच जैस्वाल डॉक्टर येतील, असे सांगितले. त्यानंतर दोन-तीन तासांनी डॉक्टर आले. त्यांनी ताराला तपासले व गर्भपात केला. सर्व काही झाल्यानंतर ताराला अशक्तपणा आहे.
त्यामुळे तुम्ही आजची रात्र येथेच थांबा व उपचार झाल्यानंतर तिला घेऊन जा, असे डॉ. जैस्वालने सांगितले. त्यामुळे महिलेसोबत तिची जाऊ थांबली. मग १० ऑक्टोबर २०२२ ला सर्व जण धोपटेश्वर येथे गेले. त्याच दिवशी घरी गेल्यानंतर दुपारी ताराला चक्कर आली. बाथरूमला गेल्यानंतर रक्तस्त्राव सुरू झाला. रक्तस्त्राव थांबत नसल्यामुळे तिने डॉक्टरांना फोन केला. डॉ. जैस्वाल याने ताराला उपचारासाठी आणण्यास सांगितले. नातेवाईक ताराला घेऊन पुन्हा आले. प्रकृती अधिक खालावल्यामुळे घाटीत दाखल केले. तेथे १२ ऑक्टोबर २०२२ रोजी मृत्यू झाला. याप्रकरणी बेगमपुरा ठाण्यात गुन्हा नोंदविल्यानंतर तपास उपनिरीक्षक विशाल बोडखे करीत आहेत.
जनावराने पोटात लाथ मारल्याचे सांगितलेया प्रकरणात सुरुवातीला हर्सूल पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. तेव्हा नातेवाइकांनी मृत ताराच्या पोटात जनावराने लाथ मारल्याचे सांगितले. मात्र डॉक्टरांच्या रिपोर्टमध्ये गर्भपातामुळे अतिरक्तस्त्राव होऊन मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार पोलिसांनी तपास केल्यानंतर घटनास्थळ बेगमपुरा हद्दीत असल्यामुळे घटना हर्सूलमधून बेगमपुरा ठाण्यात वर्ग केली. पोलिसांनी अधिक तपास करीत मृताच्या जावेने दिलेल्या फिर्यादीवरून दोघांच्या विरोधात गुन्हा नोंदवला.
आरोपी फरारमहिलेचा मृत्यू झाल्यानंतर गर्भपात करणारा डॉ. श्याम जैस्वाल, परिचारिका सविता सोमनाथ थोरात हे दोघेही तेव्हापासून फरार आहेत. या आरोपींचा शोध उपनिरीक्षक विशाल बोडखे यांचे पथक घेत असल्याची माहिती निरीक्षक पोटे यांनी दिली.