छत्रपती संभाजीनगर : आई-वडिलांसोबत वाद झाल्याने रागाच्या भरात हॉस्टेल सोडून पळून गेलेल्या १७ वर्षीय मुलीवर चार जिल्ह्यांत चार तरुणांनी मदतीच्या बहाण्याने अत्याचार केले. वेदांतनगर पोलिसांनी मुलीला शोधल्यानंतर स्वतः मुलीनेच ही धक्कादायक माहिती दिली. त्यानंतर तीन पथकांच्या मदतीने वेदांतनगर पोलिसांनी समाधान शिंदे (२७, रा. पुणे), निखिल बोर्डे (२६, रा. नाशिक), प्रदीप शिंदे (२७, रा. परभणी) व रोहित ढाकरे (२४, रा. पुसद) यांना अटक केली.
नीट परीक्षेची तयारी करणारी बाहेरगावची १७ वर्षीय मुलगी शहरात खासगी होस्टेलमध्ये राहते. अभ्यासाच्या तणावातून तिचे आई-वडिलांसोबत वाद झाले. त्या रागातून ३० नोव्हेंबर रोजी ती हॉस्टेलमधून पळाली. मुलीशी संपर्क न झाल्याने आई-वडिलांनी शहरात धाव घेतल्यावर ही बाब उघडकीस आली. त्यांनी वेदांतनगरच्या निरीक्षक प्रविणा यादव यांची भेट घेतली. यादव यांनी तत्काळ अपहरणाचा गुन्हा दाखल केला. तांत्रिक तपासात मुलगी पुण्यात असल्याचे कळताच पथकाने जाऊन तिला ताब्यात घेतले. चौकशीत तिने पळून जाण्याचे कारण सांगत तिच्यासोबत झालेल्या अत्याचाराची धक्कादायक बाब सांगितली. त्यानंतर यादव यांच्या सूचनेवरून उपनिरीक्षक वैभव मोरे, संगीता गिरी, नामदेव सुपे यांचे पथक तातडीने रवाना झाले.
कोणी चालक, तर कोणी रेल्वे स्थानक, पेट्रोल पंपावर कर्मचारीहॉस्टेल सोडल्यावर तरुणी सर्वप्रथम परभणीला गेली. तेथे रेल्वे स्थानकावर तिला प्रदीप भेटला. राहण्यासाठी जागा देण्याचे आमिष दाखवून त्याने अत्याचार केला.- त्यानेच तिला पुसद येथे सोडले. पुसदला ओळखीचा असलेल्या रोहितने पुढे जाण्यासाठी मदत करण्याच्या बहाण्याने अत्याचार केला.- ती त्यानंतर नाशिकला गेली. तेथे पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या निखिलसोबत भेट झाली. त्यानेही तिला जेवण, राहण्यासाठी पैसे देण्याच्या बहाण्याने अत्याचार केले.- पीडिता नंतर पुण्याला गेली. तेथे टॅक्सीचालक समाधानसोबत भेट झाली. त्यानेही तिच्यावर अत्याचार केले.
सीमकार्ड बदलत गेलीशहर सोडताच मुलीने मोबाइल बंद केला. त्यामुळे पोलिसांना तिला शोधण्यात अडचणी येत होत्या. ती आरोपींच्या मदतीने वेगवेगळे सीमकार्ड खरेदी करून ठराविक वेळी मोबाइल सुरू करत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी लोकेशनच्या आधारे तिचा पुण्यात शोध घेतला व कुटुंबाच्या सुपूर्द केले.