छत्रपती संभाजीनगर : कडा कार्यालयाच्या मैदानावर चक्क पोलिस हवालदाराने फुलविली पेरूची बाग. चार वर्षांपासून या बागेत भाजीपाल्याचे आंतरपीकही घेत आहे. विशेष म्हणजे या बागेसाठी महापालिकेच्या पाण्याचा वापर केला जात असल्याचेही ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत आढळून आले.
गजानन महाराज मंदिराजवळील लाभक्षेत्र विकास प्राधिकरण (कडा)चे मुख्य अभियंता आणि अधीक्षक अभियंता यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांचे कार्यालयाच्या मैदानावर शहर पोलिस दलातील एका पोलिस कर्मचाऱ्याने तीन वर्षांपूर्वी आधुनिक पद्धतीने शेती सुरू केली आहे. त्यांनी लावलेली पेरूची बाग आता चांगलीच बहरली आहे. या बागेतील पेरूचे उत्पादन सुरू झाले आहे. शिवाय या बागेत ते भाजीपाल्याची आंतरपीक घेत असल्याचेही आढळून आले. कोणत्याही शासकीय जमिनीचा विनापरवाना वापर करता येत नाही. तेथे एखादी सभा घ्यायची असेल तरी कडा कार्यालयाकडे मैदानाचे भाडे शासकीय दरानुसार द्यावे लागत होते.
मात्र, चार वर्षांपासून एका पोलिस कर्मचाऱ्याने त्याच्या ओळखीचा फायदा घेत मैदानाला जाळीचे कम्पाऊंड करून त्यामध्ये शेती सुरू केल्याचे दिसून येते. सुमारे २० गुंठे जमिनीवरील या शेतीला एक गेट लावले असून, त्या गेटला कुलूप लावलेले असते. या कुलपाची चावी त्यांनी स्वत:कडे ठेवलेली असते. यामुळे कडाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही हे कुलूप उघडल्याशिवाय प्रवेश करता येत नाही. पेरूच्या बागेसोबतच केळी, पपई आणि अन्य फळांची झाडेही लावली आहेत. मेथी, कोबी, पत्ताकोबी, कांदे, लसूण आणि अन्य भाजीपाला ते नियमित बाराही महिने लागवड करीत असतात. यामुळे त्यांना भाजीपाला विकत घेण्याची गरज भासत नसल्याचे तेथे खेळण्यासाठी येणारे लोक सांगतात. या शेतातील पिकाला पाणीपुरवठा करण्यासाठी त्यांनी सिंचनही केले आहे. कडा कार्यालयाच्या नळ कनेक्शनमधून शेतीला पाणी जात असल्याचे दिसते.
तेथे तर वृक्षलागवड केलेली आहेकडा कार्यालयाच्या मैदानावर वृक्ष लागवड करण्यासाठी संबंधितांना जागा उपलब्ध करण्यात आलेली आहे. मी येथे रूजू होण्यापूर्वी ही जागा संबंधितांना दिल्याची माहिती आहे. तेथे भाजीपाला पिकविला जात असल्याचे आपण कम्पाऊंड वॉलच्या आतमध्ये जाऊन पाहिले नाही.- एस. के. सब्बीनवार, अधीक्षक अभियंता, कडा.