फुलंब्री : घरी आलेल्या ओळखीच्या इसमाने महिलेचा खून करून तिचे दागिने घेऊन पोबारा केला. तसेच हे दागिने बँकेत ठेवून स्वत:चे कर्ज फेडले. ही धक्कादायक घटना फुलंब्री तालुक्यातील निधोना येथे शुक्रवारी घडली. मंदाबाई बाबासाहेब राऊतराय (वय ४५) असे मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी सहा तासांत या घटनेचा छडा लावून आरोपी बाळू कारभारी दापके (रा.दरेगाव, ता. कन्नड) या आरोपीला ताब्यात घेतले.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निधोना येथील मंदाबाई राऊतराय यांच्या पतीचे पाच वर्षांपूर्वी निधन झालेले असून त्यांना दोन मुले आहेत. ही मुले छत्रपती संभाजीनगर येथे शिक्षणासाठी राहतात. निधोना येथे मंदाबाई या आपल्या अंध सासूसोबत राहत होत्या. आरोपी बाळू कारभारी दापके हा कन्नड तालुक्यातील दरेगावचा असून त्याचे गावाजवळच बहिरगावला गॅरेज आहे. मंदाबाई यांचे माहेर दरेगाव असल्याने आरोपीचे त्यांच्या घरी येणे-जाणे होते. त्यामुळे मंदाबाईकडे सोन्याचे दागिने असल्याचे त्याला माहिती होते. आरोपी बाळू दापके कर्जबाजारी होता, त्याला पैशांची आवश्यकता असल्याने त्याने मंदाबाईला संपवून दागिने लुटण्याचा डाव रचला. त्यानुसार गुरुवारी तो मंदाबाई यांच्या घरी मुक्कामी थांबला. मंदाबाई यांच्या सासू अंध असून त्यांना काही ऐकू नाही, याचा फायदा घेत बाळू दापकेने शुक्रवारी पहाटे साडेचार वाजण्यादरम्यान मंदाबाई यांचा गळा आवळून खून केला व त्यांचे दागिने घेऊन पोबारा केला.
दुसऱ्या दिवशी मंदाबाई त्यांच्या घरात मृतावस्थेत आढळल्याची माहिती पोलिस पाटलांनी वडोद बाजार पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. मंदाबाईंचा खून झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आल्यानंतर गुन्हे शाखेने तपासाला सुरुवात केली. खबऱ्याने दिलेल्या माहितीनुसार व तांत्रिक विश्लेषणानंतर आरोपी बाळू दापके याचे नाव समोर आले. पोलिसांनी सहा तासांत त्याला बेड्या ठोकल्या. तपासात त्याने खून केल्याचे कबूल केले. याप्रकरणी वडोद बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. रामेश्वर रेंगे, पोउनि. विजय जाधव, प्रदीप ठुबे, स. फौजदार गजानन लहासे, बाळू पाथ्रीकर, पोहेकॉ. नामदेव सिरसाठ, पोना. नरेंद्र खंदारे, पोकॉ. ज्ञानेश्वर मेटे, संजय तांदळे, संतोष डमाळे, योगेश तरमळे, जिवन घोलप यांनी केली. या घटनेचा पुढील तपास वडोदबाजार ठाण्याचे सपोनि. विलास मोरे करीत आहेत.
बँकेत दागिने गहान ठेवून काढले दीड लाखआरोपी बाळू दापकेने मंदाबाई यांचा खून करुन त्यांचे सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला. सकाळी ११ वाजता कन्नड येथे पोहोचून त्याने एका पतसंस्थेत सदर दागिने गहान ठेवले. त्यातून त्याने दीड लाख रुपये रक्कम काढून गावी जावून त्याने कर्ज फेडले. मात्र, पोलिसांनी त्याला घटनेनंतर सहा तासांत अटक केली. पोलिसी खाक्या दाखविताच त्याने घटनेची कबुली देऊन सर्व घटनाक्रम सांगितला.