पैठण: बकरीचा जीव वाचविण्यासाठी मागचा पुढचा विचार न करता शेततळ्यात उडी घेतलेल्या पशुपालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोलनापूर ( ता पैठण) येथे बुधवारी उघडकीस आली. आप्पासाहेब भाऊसाहेब गांगुर्डे (४०) असे मयताचे नाव आहे.
भूमिहीन असल्याने सोलनापूर येथील आप्पासाहेब गांगुर्डे हे शेळ्या पालन करून उदरनिर्वाह करायचे. मंगळवारी सकाळी आप्पासाहेब यांनी सोलनापूर शिवारात चारण्यासाठी शेळ्यांना मोकळे सोडले होते. शेळ्याची रखवालदारी करत असताना दुपारी ४ वाजेच्या दरम्यान बद्रीनाथ खराद यांच्या शेतातील शेततळ्यात त्यांची बकरी पडली. बकरीला वाचविण्यासाठी मागचा पुढचा विचार न करता आप्पासाहेब यांनी शेततळ्यात उडी मारली. त्यांना चांगले पोहता येत होते, बकरीला वाचविले परंतू शेततळ्यातून बाहेर पडण्यासाठी तळ्यात दोर सोडलेला नसल्याने त्यांना बाहेर येता येईना. मदतीसाठी हाका मारल्या परंतू उपयोग झाला नाही.
ज्या बकरीला वाचविण्यासाठी तळ्यात उडी मारली ती बकरी डोळ्यासमोर बुडाली. कुणीतरी येईल या आशेवर आप्पासाहेब शेततळ्यातून जिवाच्या आकांताने ओरडत होते. परंतु त्या भागात कुणीच आले नाही... शेवटी आप्पासाहेब यांचाही बुडून मृत्यू झाला. इकडे आंधार पडायच्या आत बकऱ्या घरी घेऊन येणारे आप्पासाहेब घरी न आल्याने कुटुंबाकडून विचारपूस सुरू होती. रात्री १० वाजेच्या दरम्यान बकऱ्या घरी परतल्या मात्र आप्पासाहेब आले नाही. गावकऱ्यांनी आप्पासाहेबाचा शोध सुरू केला. बुधवारी सकाळी बद्रीनाथ खराद यांच्या शेतात आप्पासाहेब व त्यांची शेळी दोघांचे शव आढळून आले. आप्पासाहेब यांच्या पश्चात आई वडील, एक मुलगी दोन मुले असा परिवार आहे. आप्पासाहेब गांगुर्डे यांच्या अपघाती मृत्यूने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.