छत्रपती संभाजीनगर : किलेअर्क परिसरातील एक हजार मुलांच्या शासकीय वसतिगृहास महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याचा निर्णय शासनाने घेतला. १७ मे रोजी रिपब्लिकन विद्यार्थी सेना व पँथर्स रिपब्लिकन विद्यार्थी आघाडीच्या संयुक्त विद्यमाने या मागणीसाठी मोठे आंदोलन केले होते. या दोन्ही संघटनांच्या आंदोलनाला यश आल्यामुळे विद्यार्थ्यांनी आनंदोत्सव साजरा केला.
तत्कालीन समाजकल्याण मंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या कार्यकाळात २८ जून २००७ च्या शासन निर्णयानुसार मुंबई, पुणे, नाशिक, औरांगाबाद, अमरावती, नागपूर आणि लातूर या विभागीय ठिकाणी एक हजार विद्यार्थी क्षमतेची एकूण ७ नवीन शासकीय वसतिगृहे सुरू करण्यात आली. शहरातील किलेअर्क परिसरात प्रत्येकी २५० विद्यार्थी क्षमतेची एकूण चार युनिट असे एक हजार विद्यार्थी क्षमतेचे वसतिगृह आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिक्षणाची व राहण्याची सोय व्हावी, यासाठी समाज कल्याण विभागामार्फत हे वसतिगृह चालविले जाते. मात्र, याठिकाणी विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या निकृष्ट सुविधांबाबत हे वसतिगृह सातत्याने वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. तथापि, १७ मे रोजी रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे सचिन निकम, प्रदेशाध्यक्ष विवेक बनसोडे, आशिष गाडे, पँथर्स विद्यार्थी आघाडीचे गुणरत्न सोनवणे, कुणाल भालेराव, अविनाश कांबळे, सम्यक सरपे, प्रा. प्रबोधन बनसोडे, प्रवीण हिवराळे, सागर ठाकूर यांनी आंदोलन करुन विद्यार्थ्यांना दर्जेदार सुविधा द्या व या वसतिगृहास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे, यासाठी आंदोलन केले होते. त्यानंतर सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, तत्कालीन आयुक्त प्रशांत नारनवरे यांच्या भेटी घेऊन सतत पाठपुरावा केला होता. अखेर सामाजिक न्याय विभागाने २२ ऑगस्ट रोजी या वसतिगृहास महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर १००० मुलांचे शासकीय वसतिगृह, असे नाव देण्याचा शासन निर्णय जारी केला.
नाव दिल्याचा आनंदच, पण सुविधांचे कायशासनाने या वसतिगृहास डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव दिल्याचा आनंद आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. मात्र, विद्यार्थ्यांना सुविधा देण्यासाठी प्रशासन उदासीन आहे. वसतिगृह संपूर्ण सुविधांनी सज्ज करण्यासाठी आमचे आंदोलन चालूच राहील.- सचिन निकम, रिपब्लिकन विद्यार्थी