खुलताबाद : केदारनाथ येथे देवदर्शनासाठी गेलेल्या खुलताबाद तालुक्यातील भांडेगाव येथील भाविकाचा मंगळवारी दरड कोसळल्याने डोक्यात दगड पडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी ( दि. २१) घडली. रावसाहेब विठ्ठल चव्हाण (वय ६२, रा. भांडेगाव, ता. खुलताबाद, जि. छत्रपती संभाजीनगर) असे या मृत्यू झालेल्या भाविकाचे नाव आहे.
खुलताबाद तालुक्यातील भांडेगाव येथील भाविक रावसाहेब चव्हाण, त्यांची पत्नी अंतिका रावसाहेब चव्हाण, त्यांची बहीण, भाऊजी, नात यांच्यासह गावातील काही भाविक ३ मे रोजी चारधाम यात्रेला गेले होते. केदारनाथ येथे असताना मंगळवारी (२१ मे) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अचानक पाऊस सुरू झाला. यामुळे भाविकांनी डोंगराच्या कडेला आसरा घेतला. त्यावेळी अचानक डोंगराच्या माथ्यावरून दरड कोसळली. यातील एक दगड डोक्यात पडल्याने रावसाहेब चव्हाण यांचा मृत्यू झाला. सुदैवाने इतर भाविक बचावले. आज गुरूवारी रात्री ७:३० वाजता भांडेगावात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जटवाडा येथील शिक्षक रामेश्वर चव्हाण यांचे ते वडील होत.