सिल्लोड: तालुक्यातील शेखपूर येथे अन्न पाण्याच्या शोधात आई पासून भटकलेला व भटकंती करणारा एक बिबट्या शेतकऱ्यांना दिसला तो मका पिकातून पाणी पिण्यासाठी थेट एका विहिरीच्या कठड्यावर चढला. याची माहिती वनविभागाला देण्यात आली वन कर्मचाऱ्यानी त्याला शिताफीने पकडले हा बिबट्या मंगळवारी दुपारी दिसला.
शेखपूर येथील शेतकरी नवाबखा महेबूबखा यांच्या शेतात मका व कापूस पीक पेरलेले आहे दुपारी शेतात काम करत असताना मका पिकात त्यांना बिबट्या वावरताना दिसला त्यांनी गावात लोकांना व सिल्लोड वनविभागाला माहिती दिली. वनविभागाचे वनरक्षक पी.एन. राजपूत, वनमजुर दत्तू कोल्हे अवघ्या १० मिनिटात घटनास्थळी पोहचले. त्यांनी बिबट्यास पडकले असून पिंजऱ्यातून सिल्लोड वनविभागात नेले जाणार आहे. आईपासून पिल्लू भटकले असावे असा अंदाज वनविभागाचा आहे. आसपास कुठे मादी बिबट्या सापडते का याचा शोध वन अधिकारी घेत आहेत. दरम्यान, आमठाणा व शेखपूर परिसरात कापूस व मका पिकात बिबटे दिसल्याने शेतकरी, मजुरांमध्ये घबराट पसरली आहे.
उपचार करणारपशुवैद्यकीय अधिकारी बिबट्यावर उपचार करतील. ते उपाशी आहे का ? याची तपासणी करून त्याला खायला दिले जाईल. त्यानंतर डोंगरात सोडले जाईल. शेतकऱ्यांनी घाबरू नये खबरदारी घ्यावी.- संजय भिसे,वनपरिक्षेत्र अधिकारी, सिल्लोड.
आमठाण्यात ही दिसला होता बिबट्याआमठाणा येथील शेतवस्ती दत्तवाडीत सोमवारी दुपारी शेतकरी संतोष चाथे यांना शेतात बिबट्या दिसला होता. बिबट्याने डरकाळी फोडली तेव्हा त्यांनी शेतातून पळ काढत घर गाठले. त्यानंतर आज शेखपुर येथे हे पिल्लू सापडले.