औरंगाबाद : विद्यार्थ्यांनो, प्रासंगिकता, स्थानिक गरज, राष्ट्रीय स्तरावर महत्व आणि आंतराष्ट्रीय स्तरावरील मान्यता ही संशोधन विषय निवडताना लक्षात घ्या. तुमच्या संशोधनाची स्पर्धा जागतिक स्तरावर असल्याने त्या दर्जाचा विषय संशोधन निवडायला हवा. मार्गदर्शक, विषय तज्ज्ञांनी संशोधन विस्तारून दर्जा सुधारण्याची अपेक्षा आहे. विद्यापीठ पुढील काळात संशोधन प्रबंधाच्या अंतिम मूल्यमापन अहवालाचा नमुना तयार करून गाईड, विषय तज्ज्ञांना देईल, असे कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले म्हणाले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील युजीसी मानव संसाधन विकास केंद्राच्या माध्यमातून प्री.पीएच.डी. कोर्सचे उद्घाटन कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांच्या हस्ते विद्यापीठातील नाट्यगृहात झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अधिष्ठाता डॉ. भालचंद्र वायकर, डॉ. वाल्मिक सरवदे, डॉ. प्रशांत अमृतकर, डॉ. चेतना सोनकांबळे, डॉ. भारती गवळी, संचालक डॉ. मुस्तजीब खान, डाॅ. भास्कर साठे यांच्यासह प्राध्यापक, गाईड यांची प्रमुख उपस्थिती होती.
राज्यात सर्वाधिक विद्यार्थी विद्यापीठात संशोधन करत आहेत. त्या दृष्टीने कोर्सवर्कवर विद्यापीठाने लक्ष केंद्रित केले आहे. २०२२-२३ या वर्षातील प्री.पीएच.डी कोर्स २४ ऑगस्ट ते ०६ ऑक्टोबर या दरम्यान चालणार आहे. या कोर्ससाठी संशोधक १०५५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला, अशी माहिती डॉ. मुस्तजीब खान यांनी दिली. कार्यक्रमाचे संचालन डॉ.अब्दुल राफे यांनी केले.
संशोधकाचे प्रतिबिंब प्रबंधात उतरावेकुलगुरु डॉ. येवले म्हणाले की, विद्यापीठातील प्री.पीएच.डी. कोर्स वर्कमध्ये सहभागी संशोधक विद्यार्थ्यांनी आपल्या संशोधनाबाबतच्या संकल्पना व मांडणी यांचा सविस्तर अभ्यास करावा. या कोर्स वर्कमध्ये संशोधनात अपेक्षित अशी मांडणी करण्यासाठी उपयुक्त ठरेल. संशोधन हे कौशल्याधारित कार्य असल्याने यांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. तसेच त्यात संशोधकाचे प्रतिबिंब उमटावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.