छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील १५ विद्यार्थी वसतिगृहांच्या प्रशासनात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. वॉर्डन, रेक्टर या पदांवरील नियुक्त्यांमध्ये बदल करण्यात आला असून, त्रिस्तरीय रचना करण्यात आली आहे. त्यानुसार रेक्टर पदावर प्राध्यापकांची तर वाॅर्डनपदी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. संबंधितांना त्यांच्या कामाचे स्वरूपही सांगण्यात आले आहे. या सर्व यंत्रणेवर नियंत्रण ठेवण्यासाठी चीफ रेक्टर हे नवीन पद तयार केले असून, त्या पदावर डॉ. सतीश दांडगे यांची नियुक्ती केली आहे.
विद्यापीठात मुलांचे आठ तर मुलींची सात वसतिगृहे आहेत. कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी विविध विभागांतील प्राध्यापकांची नवीन ’रेक्टर’ ची नियुक्ती केली आहे. तसेच वसतिगृहांच्या सर्व रेक्टरवर वॉर्डन यांच्यासह देखरेख करण्यासाठी चीफ रेक्टर म्हणून लोकप्रशासन विभागातील प्राध्यापक डॉ. सतीश दांडगे यांची नियुक्ती केली.
नवनियुक्त रेक्टरमध्ये डॉ. सतीश भुसारी यांच्याकडे छत्रपती शिवाजी महाराज वसतिगृह क्रंमाक एक, डॉ. सुनील निंभोरे यांच्याकडे सिद्धार्थ संशोधन छात्र मुलांचे वसतिगृह क्र.२, डॉ. चंद्रकांत कोकाटे यांना कर्मवीर भाऊराव पाटील मुलांचे वसतिगृह क्र.३, डॉ. मदन सूर्यवंशी यांना महर्षी विठ्ठल रामजी शिंदे मुलांचे वसतिगृह क्र.४, डॉ. अमोल खंडागळे यांना शहीद भगतसिंग मुलांचे वसतिगृह क्र.५, डॉ. प्रभाकर उंद्रे यांचे विद्यार्थी वसतिगृह, डॉ. सुचिता यंबल यांच्याकडे आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृह, डॉ. सुहास पाठक यांना मुलांचे वसतिगृह क्र. ६ नवीन या ठिकाणी रेक्टर म्हणून नेमले आहे. मुलींच्या वसतिगृहांमध्ये डॉ. सविता बहिरट यांच्याकडे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले विद्यार्थिनी वसतिगृह, डॉ. गीतांजली बोराडे यांना मातोश्री जिजाऊ विद्यार्थिनी वसतिगृह, डॉ. कावेरी लाड यांना पीएच.डी. विद्यार्थिनी वसतिगृह, डॉ. निर्मला जाधव यांची प्रियदर्शिनी विद्यार्थिनी वसतिगृह, डॉ. प्रवीणा पवार यांची नायलेट, डॉ. योगिता पद्ये यांची रमाबाई आंबेडकर अल्पसंख्याक विद्यार्थिनी वसतिगृह आणि डॉ. गौरी कल्लावार यांची स्व. यशवंतराव चव्हाण मुलींचे वसतिगृह या ठिकाणी नियुक्ती केली.
वाॅर्डन, रेक्टरला मिळणार संचालकांचे सहकार्यविद्यापीठाचे विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. कैलास अंभुरे व विभागातील सर्व कर्मचारी, विविध वसतिगृहांचे वाॅर्डन या रेक्टरला सहकार्य करणार आहेत. सामान्य प्रशासन विभागाचे प्रमुख डॉ. कैलास पाथ्रीकर यांच्याकडे वसतिगृहाच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.