वाळूज महानगर : गुन्हेगाराची माहिती पोलिसांना देत असल्याच्या संशयावरून एका ४० वर्षीय महिलेस मारहाण करून एकाने अत्याचार केल्याची घटना शुक्रवार (दि.१९) रात्री ९ वाजेच्या सुमारास वाळूज परिसरात घडली. याप्रकरणी आठजणांविरुद्ध वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित महिला अश्विनी (नाव बदलले आहे) कुटुंबासह वाळूज परिसरात वास्तव्यास असून, वाळूजच्या लक्ष्मी गायरानात शेती कसून उपजीविका करते. अश्विनीच्या मोठ्या मुलास दारूचे व्यसन असल्याने तो सतत आई तिला शिवीगाळ करीत असल्याने ती आठवडाभरापूर्वी घर सोडून शेतात राहण्यास गेली होती. शुक्रवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास जेवण केल्यानंतर अश्विनी या घरात बसलेल्या असताना त्यांच्या ओळखीचे संदीप पवार, शिवा गवळी, पोपट नारायण पवार, धानेश नारायण पवार, तोजश अक्षय काळे, जिजाबाई धानेश पवार, अश्विनी पोपट पवार व गंधुका सुदर्शन पवार हे अश्विनी यांच्यात घरात शिरले. यानंतर सर्वांनी अश्विनीसोबत वाद घालण्यास सुरुवात केली.
अश्विनी यांच्या घरात शिरल्यानंतर पोपट पवार याने तिला मुंबईवरून चोऱ्या करून आलेल्या पारध्यांची माहिती पोलिसांना का देते, या कारणावरून तिला शिवीगाळ सुरू केली. यावेळी अश्विनी हिने मी पोलिसांची खबरी नाही, असे सांगत त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र संतप्त झालेल्या पोपट पवार व त्याच्या सहकाऱ्यांनी अश्विनीला खाली पाडून मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी अश्विनी हिने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता धानेश पवार याने, तू जर आवाज केला तर तुझ्या मेव्हणाप्रमाणे तुलाही कापून टाकीन अशी धमकी दिली. यानंतर सर्वांनी अश्विनी हीस बेदम मारहाण केली.
मारहाणीनंतर एकाने केला अत्याचारशेतवस्तीवर रात्री एकटी असलेल्या अश्विनी यांनी अनेकदा गयावया करूनही आरोपींनी तिला बेदम मारहाण केली. या मारहाणीनंतर शिवा गवळी याने अश्विनीची छेड काढली, तर सोल्जर पवार या नराधमाने तिच्यावर पाशवी अत्याचार केला. या अत्याचारानंतर पोपट पवार याने आपल्या सहकाऱ्यांना आपले काम झाले आता येथून चला, असे म्हणून सर्वजण घटनास्थळावरून निघून गेले.
आठ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखलया अत्याचाराच्या घटनेनंतर घाबरलेल्या अश्विनी यांनी वाळूज पोलिस ठाणे गाठून आपबिती कथन केली. यानंतर पोलिसांनी अश्विनी हीस वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. या मारहाण व अत्याचार प्रकरणी आठजणांविरुद्ध वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक सचिन इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मनीषा केदार या करीत आहेत.