छत्रपती संभाजीनगर: अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्यामुळे पतीने आत्महत्या कर नाही तर मी तुला मारून टाकीन अशी धमकी दिल्यानेच विवाहिता शुभांगी विनोद काळे हिने १३ मे रोजी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची तक्रार मृताच्या आईने मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात नोंदविली आहे. याप्रकरणी पोलिसांनी विवाहितेच्या पतीसह सासरच्या पाच जणांविरोधात विवाहितेला आत्महत्येस प्रवृत केल्याचा गुन्हा नोंदविला.
पती विनोद काळे, सासरा विजय काळे, दीर विश्वनाथ, सासू आणि जाऊ (सर्व रा. जयभवानीनगर)यांचा आरोपीमध्ये समावेश आहे. याघटनेविषयी मुकुंदवाडी पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार महिलेची मुलगी शुभांगी आणि विनोद काळे यांचा विवाह २०१५ मध्ये झाला होता. लग्नानंतर या दाम्पत्याला एक अपत्य झाले. मात्र गेल्या काही महिन्यापासून त्यांच्यात कुरबूर सुरू होती. यातूनच शुभांगी यांनी १३ मे रोजी सकाळी ११ वाजता जयभवानीनगर येथील घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्येप्रकरणी शुभांगीच्या आईने आरोपी पतीसह सासरच्या मंडळीविरोधात मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. मृताचा पती विनोद याचे दुसऱ्या महिलेसोबत प्रेमसंबंध होते. यामध्ये शुभांगी ही विनोदला अडसर ठरत होती.
यामुळे तो तिला आत्महत्या कर नाहीतर मी तुला मारून टाकीन अशी धमकी द्यायचा असे शुभांगीने तक्रारदार यांना सांगितले होते. तर शुभांगीचे सासू सासरे आणि दीर व जाऊ हे सुद्धा विनोदचीच बाजू घेऊन तिला एकाकी पाडत आणि तिला त्रास देत. त्यांनीच शुभांगीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदविल्याचे पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे यांनी सांगितले. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक बचाटे करीत आहेत.
भिंतीवर लिहिली सुसाईड नोटविवाहितेने ज्या खोलीत आत्महत्या केली त्या खोलीच्या भिंतीवर माझ्या आत्महत्येला कोणीही जबाबदार नसल्याचे लिहिलेले होते. हे वाक्य शुभांगी यांनी लिहिल्याचे तिच्या सासरच्या मंडळीचे आहे. पेालिसांनी ही सुसाईड वाक्य तिचे आहे अथवा नाही, हे तपासण्यासाठी हस्ताक्षर तज्ज्ञांची मदत पोलिस घेणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.