छत्रपती संभाजीनगर : सीएच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विवाहितेने बेडरुममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास अजबनगर येथे उघडकीस आली. या प्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती निरीक्षक संतोष पाटील यांनी दिली.
सुषमा महेश नेवारे (३२, रा. अजबनगर) असे गळफास घेतलेल्या विवाहितेचे नाव आहे. क्रांतीचौक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दहा वर्षापूर्वी सुषमा यांचा विवाह महेश नेवारे यांच्याशी झाला होता. त्यांचा पती खाजगी बँकेत नाेकरीला आहे. त्यांची स्वत:ची एक अभ्यासिका आहे. त्यात १०० विद्यार्थी अभ्यास करतात. दररोजच्या नियमाप्रमाणे पती- पत्नी जेवण करून बेडरूममध्ये झोपले. त्यांचा पाच वर्षांचा मुलगा आजोबासोबत झोपला होता. पती-पत्नी सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास झोपेतून उठले.पती दुसऱ्या मजल्यावरील अभ्यासिका स्वच्छ करण्यासाठी निघून गेला. त्यानंतर सुषमा यांनी आतून दरवाजा लावून साडीने गळफास घेतला. पाच वर्षांचा मुलगा खाली आल्यानंतर त्याने दरवाजा वाजवला. तेव्हा तो आतुन बंद होता. त्याने खिडकीतून पाहिले असता, सुषमा या फॅनला लटकलेल्या दिसून आल्या.
तेव्हा कुटुंबातील सदस्यांनी दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश करीत त्यांना बेशुद्ध अवस्थेत घाटी रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केले. कोणत्याही प्रकारचे वाद नसताना सुषमा यांनी कशामुळे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान, सुषमा यांच्या मैत्रिणीच्या सांगण्यानुसार त्यांना सीएच्या परीक्षेचा ताण होता. दोन वेळा परीक्षा देऊनही उत्तीण झालेल्या नसल्यामुळे मागील तीन दिवसांपासून त्या तणावात असल्याचे सांगण्यात आले. त्यातुनच त्यांनी टोकाचे पाऊल उचलले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
शेवटचा कॉल आईलासुषमा यांनी बुधवारी रात्री शेवटचा कॉल आईलाच केला होता. आईसोबत त्यांनी चांगला संवाद साधला. कोणतीही अडचण सांगितली नाही. सकाळी घटना समजल्यानंतर त्यांच्या आईलाच धक्का बसला. शवविच्छेदनाच्या अहवालानुसार सुषमा यांचा मृत्यू गळफास घेतल्याचे झाल्याचे स्पष्ट झाले. अधिक तपास सहायक निरीक्षक डॉ. विशाल इंगळे करीत आहे.