छत्रपती संभाजीनगर : एक महिन्यापूर्वी विवाह झालेल्या युवतीने प्रियकरासोबत ठाण्यातून पळ काढला. पुण्यातून हे जोडपे छत्रपती संभाजीनगरात मंगळवारी सायंकाळी दाखल झाले. दोघांना एकत्रित राहता येत नाही, त्यामुळे एकनाथनगर भागातील रेल्वेसमोर रात्री ९.३० वाजता युवकाने उडी घेतली. त्याच्या पाठोपाठ युवतीनेही उडी घेण्याचा प्रयत्न केला. त्यात युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर युवती जखमी झाली. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद उस्मानपुरा पोलिस ठाण्यात केल्याची माहिती निरीक्षक गिता बागवडे यांनी दिली.
उमेश मोहन तारू (२३, रा. चांगदेव, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव) असे मृत प्रियकराचे तर पुजा विनोद तायडे (१९, रा. हनुमानकुंडनगर, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव) असे जखमी विवाहित युवतीचे नाव आहे. उस्मानपुरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उमेश व पुजा यांचे अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध होते. त्यास दोन्ही कुटुंबाचा विरोध असल्यामुळे पुजाचा विवाह मध्यप्रदेशातील बुऱ्हाणपुर जिल्ह्यातील युवकासोबत २८ फेब्रुवारी २०२३ रोजी झाला. पुजाचा पती ठाणे येथे एका खाजगी कंपनीत नोकरीला आहे. लग्नानंतर पुजा काही दिवस सासरी राहिल्यानंतर माहेरी आली. दोन दिवसांपूर्वी ती ठाण्यात नवऱ्याकडे राहण्यास गेली. तेव्हा उमेश आणि पुजात फोनवरून बोलणे सुरू होते. उमेश तिला भेटण्यासाठी ठाण्यात गेला. तेथून दोघे पळून पुण्यात आले. उमेशने पुण्यात भावाकडून काही पैसे घेतले. त्यानंतर दोघे छत्रपती संभाजीनगर येथे बसने मंगळवारी सायंकाळी पोहचले. शहरातच लॉजवर दोघे राहणार होते.
मात्र, दोघांच्या कुटुंबांना सोबत असल्याची माहिती मिळाल्यानंतर फोन सुरू झाले. युवतीचा विवाह झालेला असल्यामुळे मुलाचे कुटुंब दोघांच्या विवाहाला मान्यता देणार नाहीत, या भितीमुळे उमेशने सोबत राहू शकत नाहीत तर आत्महत्या करू असा निर्णय घेतला. त्यासाठी दोघे चालतच एकनाथनगर भागातील रेल्वे रूळाकडे गेले. युवती उमेशच्या मोबाईलवरून त्याच्या भावाशी बोलत असतानाच ९.३० वाजेच्या सुमारास आलेल्या रेल्वेसमोर उमेशने उडी घेतली. रेल्वेच्या धडकेने तो दुरवर फेकला गेला. युवतीनेही रेल्वेकडे धाव घेतली. तिच्या डोक्याला मार लागला. उमेश जागीच ठार झाल्यामुळे युवतीने मदतीसाठी अनेकांना बोलावले. मात्र, उस्मानपुरा पोलिस आल्यानंतर त्यांनी दोघांना घाटीत दाखल केले. या घटनाक्रमाविषयी उस्मानपुरा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक रतन डोईफोने यांनी युवतीचा सविस्तर जबाब नोंदवला. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, अधिक तपास हवालदार राजेश फिरंगे करीत आहेत.