पैठण ( औरंगाबाद ): कबुतर खरेदी करण्यासाठी चक्क सख्या काकाच्या घरात सत्तर हजार रुपयांची चोरी करण्याचे धाडस एका अल्पवयीन मुलांने केल्याची घटना पैठण शहरात समोर आली आहे. पाचशेची नोट घेऊन किराणा दुकानात मौजमजेसाठी वारंवार खरेदी सुरू केल्याने तो परिसरातील नागरीकांच्या नजरेत आला. पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने चोरी केल्याचे कबूल केले असून लपून ठेवलेली काही रक्कम काढून दिली आहे.
शहरातील कुंभारवाडा परिसरातील ही घटना असून दि १७ रोजी घरातील डब्यात ठेवलेले ७० हजार रूपये चोरीस गेल्याची फिर्याद एकाने पैठण पोलीस ठाण्यात दिली होती. पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी चौकशी अंती चोरी करणारा घरातीलच असावा हा निष्कर्ष काढून खबरे सतर्क केले होते. दरम्यान फिर्यादीचा पुतण्या पाचशेच्या नोटा घेऊन वारंवार मौजमजेच्या व खाण्यापिण्याच्या वस्तू खरेदी करत असल्याचे खबऱ्याने पोलिसांना सांगितले. पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी सदर मुलास पालका करवी पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. यावेळी त्याने त्याला कबुतर विकत घ्यायचे होते. इतर मुलासारखी मौजमजा करायची होती म्हणून काकाच्या घरातून ७० हजार रूपयाची चोरी केल्याचे कबूल केले.
काही रक्कम शिल्लक असल्याचे सांगून त्याने घरात एका गोणीत लपवून ठेवलेल्या ५०० रूपयाच्या नोटा काढून दिल्या पोलिसांनी नोटा मोजल्या असता २८ हजार ५०० रुपये भरले. आणखी रक्कम कुठे आहे, असे पोलिसांनी विचारले असता घराच्या पाठीमागे त्याने जागा दाखवली. परंतु, तेथून ती रक्कम चोरी झाली होती. कबुतर पाळण्याचा छंद, व मौजमजेच्या आकर्षणाने १२ वर्षाच्या मुलाची पावले चोरीकडे वळाली. बालक अल्पवयीन असल्याने विधीसंघर्ष बालक तरतुदीनुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल असे पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी सांगितले.