मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना १०० रुपयांची मनिऑर्डर, यातच दिवाळी साजरी करण्याचे केले आव्हान
By साहेबराव हिवराळे | Published: October 25, 2022 06:57 PM2022-10-25T18:57:09+5:302022-10-25T18:57:25+5:30
शंभर रुपयांच्या किटमध्ये दारिद्र्य रेषेखालील गरीब कष्टकऱ्यांची दिवाळी साजरी होऊ शकते का?
औरंगाबाद : दिवाळी सणाच्या निमित्ताने महाराष्ट्र भारतीय जनता पक्ष आणि शिंदे सरकार यांनी गोरगरीब कष्टकरी शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्याचे अपूर्ण शिधा किट वाटप करून चेष्टा केली आहे. त्याच्या निषेधार्थ मंगळवारी काँग्रेसने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना शंभर रुपयांची मनिऑर्डर पाठवून गांधीगिरी केली आहे. ही मनिऑर्डर काँग्रेसचे शहर सचिव सुभाष पाटील यांनी पाठविली.
दारिद्र्य रेषेखाली कष्टकऱ्यांना राज्य सरकारने दिवाळीनिमित्त १०० रुपयांत शिधा देण्याची घोषणा केली, परंतु बऱ्याच ठिकाणी शिधा किट नागरिकांना मिळू शकले नाहीत. काही कार्डधारकांना अर्धवट किट मिळाले. काही किटमध्ये तेल, तर काही किटमध्ये साखर नव्हती. किट देत असताना महाराष्ट्र सरकारमधील काही मंत्र्यांनी त्यावर स्वतःचे छायाचित्र छापून प्रचार केला, अशी टीका त्यांनी केली. शंभर रुपयांच्या किटमध्ये दारिद्र्य रेषेखालील गरीब कष्टकऱ्यांची दिवाळी साजरी होऊ शकते का? आजच्या या महागाईच्या काळात गरीब कष्टकरी शंभर रुपयांत दिवाळी साजरी करीत असेल, तर त्यासोबत आपणही शंभर रुपयांमध्ये दिवाळी साजरी करून दाखवावी, असे आव्हान त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना दिले.
महाराष्ट्र ओल्या दुष्काळाच्या संकटात असताना शासन गरिबांची चेष्टा करीत आहे. देशाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांकडे मात्र दुर्लक्ष केले आहे. शिंदे, फडणवीस सरकार स्वतःच्या प्रचारात गुंतलेले आहे. जनतेच्या कामापेक्षा स्वतःच्या पक्षाचे हित, स्वतःची प्रसिद्धी व दुसऱ्या पक्षांच्या नेत्यांना नावे ठेवण्यावरच त्यांचा भर आहे. विकास आणि गरिबी निर्मूलनाची चेष्टा केली जात आहे, असा आरोप त्यांनी केला. शहर सचिव सुभाष पाटील यांच्याबरोबर सुभाष शुक्ला, सुधीर वाघ, तुकाराम साबळे यांनी सरकारला शंभर रुपयांची मनिऑर्डर पाठविली.