छत्रपती संभाजीनगर : देशातील मोठ्या शहरांमध्ये ओल्या कचऱ्यापासून गॅस निर्मिती करण्याचे आदेश गेल कंपनीला केंद्र शासनाने दिले आहेत. त्यानुसार कंपनीने छत्रपती संभाजीनगर महापालिकेकडेही प्रस्ताव पाठविला. प्रशासनाने कंपनीला सकारात्मक प्रतिसाद दिला. ओल्या कचऱ्यापासून कॉम्प्रेस बायोगॅस तयार करावा, त्यासाठी जागा, दररोज १५० मेट्रिक टन कचरा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन महापालिकेने दिले. दररोज पाच टन गॅस निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याची माहिती प्रशासक जी. श्रीकांत यांनी दिली.
‘लोकमत’ वृत्तपत्र समूहातर्फे आयोजित तीन दिवसीय ‘प्रापर्टी शो’चे उद्घाटन मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांच्या हस्ते झाले. त्यांनी सांगितले की, केंद्र शासनाच्या सतत योजनेअंतर्गत महापालिकेने ओल्या कचऱ्यापासून कॉम्प्रेस गॅस निर्मितीसाठी मोठे पाऊल टाकले आहे. त्यासाठी गेल कंपनीला गुरुवारीच पत्रसुद्धा देण्यात आले. केंद्र शासनाने नैसर्गिक इंधन स्राेतावर अवलंबून न राहता अपारंपरिक स्राेतांवर भर देण्याचे आदेश दिले. त्यानुसार केंद्राच्या सतत योजनेत गेल कंपनीचाही समावेश आहे. कंपनीने अहमदनगर, सातारा या छोट्या शहरांमध्येही सर्वेक्षण केले. छत्रपती संभाजीनगर शहर १० लाखांहून अधिक लोकसंख्या असलेले शहर असल्याने कंपनीने येथेही कॉम्प्रेस गॅस निर्मितीचा प्रस्ताव दिला.
मनपाच्या पत्रात काय?कंपनीला लागणारी १० ते १२ एकर जागा देण्याची हमी दिली आहे. दररोज १५० मे. टन ओला कचरा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. पीपीपी मॉडेलवर हा प्रकल्प असावा, प्रकल्पाची संपूर्ण मशिनरी, चालविणे, दुरुस्ती कंपनीनेच करावी. कंपनीने मनपाला जागेचे भाडे, गॅस विक्रीतून मिळालेल्या रकमेतून रॉयल्टी द्यावी. या प्रकल्पाचे संपूर्ण कार्बन क्रेडिट मनपा घेईल.