छत्रपती संभाजीनगर : दिवाळी सणात शहरात ठिकठिकाणी उफाळून आलेल्या वादातून हाणामारी, २१ घटनांत चाकूने हल्ला करण्यात आला, तर हिनानगरात सहा जणांनी मिळून एका तरुणाची हत्या केली.
चिकलठाण्याच्या हिनानगरात राहणाऱ्या इरफाना आयास शेख (३६) यांच्या घरासमोर राहणारी परवीन शेख यांच्या कुटुंबातील मुले ३ नोव्हेंबर रोजी रात्री ९:३० वाजता फटाके वाजवत होती. त्या आवाजामुळे इरफाना यांचा दीड महिन्याचा नातू घाबरत होता. त्यातून इरफाना व परवीन यांच्यात वाद झाले. याप्रकरणी दोघीही एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेल्या. तेथे त्यांच्यात तडजोड देखील झाली, परंतु घरी परवीनाच्या कुटुंबाने इरफाना यांच्या घरातील सदस्यांना मारहाण सुरू केली.
परवीनाचे भाऊ सलमान पठाण, अर्शद उर्फ आदा पठाण, अझहर पठाण यांनी इरफाना यांचा भाऊ एजाज गणी शेख यांना मारहाण सुरू केली. परवीना, तिची आई मेहरुनिसा, मुलगी जवेरिया शेख यांनी देखील मारहाण सुरू केली. या वादात अर्शदने एजाज यांच्या डोक्यात दगड घातला. रक्तबंबाळ अवस्थेत जमिनीवर पडलेल्या एजाज यांना सहा जण बेदम मारहाण करत होते. त्यातच त्यांच्या डोक्यात पुन्हा लोखंडी रॉडने वार करताच एजाज बेशुद्ध झाले. त्यांना मिनी घाटीत दाखल केले. तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. एजाज करमाड तालुक्यात शेती करत होते. निरीक्षक गजानन कल्याणकर, सहायक निरीक्षक भारत पाचोळे यांनी सहा मारेकऱ्यांना अटक केली. उपनिरीक्षक जगन्नाथ मेंदकुदळे अधिक तपास करत आहेत.
कारण फटाक्याचेच; चाकू, विळा, लाठ्या, काठ्याने वार- मोकळ्या जागेत फटाके फोडण्यास सांगितल्याच्या कारणातून अशोक केदारे (५०, रा. अंबर हिल) यांना १ नोव्हेंबर रोजी रात्री तिघांनी मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी रोहिदास देहाडे, अनिकेत रोहिदास देहाडे, कृृष्णा रोहिदास देहाडे यांच्यावर हर्सूल ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.- फटाका जवळ येऊन फुटल्याच्या कारणातून अनिकेत थोरात (२१, रा. वाळूज) याच्यावर चाकूने वार करून मारहाण झाली. याप्रकरणी वाळूज ठाण्यात अभिषेक गाेरख सोनवणे, वैभव गोरख सोनवणे कृष्णा वैजीनाथ ठाकरे व तेजस धनेश्वर यांच्यावर गुन्हा दाखल झाला.- करण प्रधान (१९) याला दुसरीकडे फटाके फोडण्यास सांगत रत्नदीप जाधव व त्याच्या आईने मारहाण करून विळ्याने चेहऱ्यावर वार केले.
गाड्यांवर फटाके फेकलेचालत्या वाहनांवर फटाके फेकल्याचा जाब विचारणाऱ्यांना मारहाण करण्यात आली. इंदिरानगरात शिवकन्या डंबाळे यांचे पती व मुलाला मारहाण करणाऱ्या किशोर किर्तीकर, किरण किर्तीकर, प्रकाश चाबुकस्वार यांच्यावर जवाहरनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तर, श्याम मिसाळ यांच्या गॅसच्या चालत्या रिक्षात फटाके फेकून त्यांनाच मारहाण करणाऱ्या साहील श्रीसुंदर, त्याचा भाऊ आतीश यांच्यावर छावणी ठाण्यात गुन्हा दाखल झाला. असे शहरात जवळपास २२ ठिकाणी वाद होऊन ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.