छत्रपती संभाजीनगर : कटकट गेट परिसरातील शरीफ कॉलनी भागातील एका इमारतीत तिसऱ्या मजल्यावर जुगार अड्डा चालविण्यात येत होता. त्या ठिकाणी छापा टाकण्यासाठी गेलेल्या पोलिस उपायुक्त नवनीत काँवत यांच्या पथकावर जुगार अड्डा चालकाने महिलांसह इतरांना पुढे करीत घरात पाळलेला कुत्रा सोडल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी रात्री घडला. काँवत यांनी अधिक कुमक मागवीत विरोध मोडून काढत छापा टाकला व मुद्देमाल जप्त केला.
पोलिस उपायुक्त नवनीत काँवत यांना शरीफ कॉलनीतील एका इमारतीमध्ये तिसऱ्या मजल्यावर जुगार अड्डा चालविण्यात येत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी विविध पोलिस ठाण्यांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सोबत घेत छापा टाकला. घरमालक आरेफ ऊर्फ बबलू शेर खानसह त्याची पत्नी शबाना, आमेर खान यांच्यासह इतरांनी पथकावर घरात पाळलेला डॉबरमॅन कुत्रा सोडला. त्याशिवाय महिलांनीही गोंधळ घातला. या सर्वांचा विरोध मोडून काढत पथक तिसऱ्या मजल्यावर गेले. तेथे जुगार खेळणारे अर्शद खान सय्यद खान (रा. रोशन गेट), शाहरुख खान शेख खान (रा. शरीफ कॉलनी), अशाद खान शाहीद खान (रा. बाबर कॉलनी), सलीम पठाण मुनाफ पठाण ( रा. किराडपुरा), शेख रफिक शेख शकील (रा.संजयनगर), इम्रान सुभान शेख (रा. बायजीपुरा), भगवान अनंतराव वारे (रा. स्टेशन परिसर) यांना पकडण्यात आले. या सर्वांकडून ३ लाख ५० हजार रुपये रोख, देश-विदेशी दारूच्या बाटल्या, असा ७ लाख ६६ हजारांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती काँवत यांनी दिली. या सर्वांवर जिन्सी ठाण्यात गुन्हे नोंदविले. कुत्रा सोडणाऱ्या चौघांवर शासकीय कामकाजात अडथळ्याचा गुन्हा नोंदवला.
महिला अधिकाऱ्यांना पाचारणआरेफ खान याच्या कुटुंबातील महिलांनी अडथळा निर्माण केला होता. त्यामुळे काँवत यांनी पोलिस निरीक्षक गीता बागवडे यांच्यासह इतर महिला अधिकाऱ्यांना बोलावले. ही कारवाई काँवत, बागवडे, सहायक निरीक्षक दिलीप चंदन, उपनिरीक्षक हरीश खटावकर, विनोद अबूज, हवालदार सुनील धुळे, विद्या राठोड, मनीषा शिंदे, राधिका वाघ, गजेंद्र शिंगणे, शोण पवार, राजेश चव्हाण, प्रेमा हाके, चित्रा भगत, संदीप धर्मे, निहालसिंग ठाकूर, विजय खांडे यांच्या पथकाने केली. तपास उपनिरीक्षक रावसाहेब काकड करीत आहेत. १० पैकी आठ आरोपींना अटक केली. या आरोपींना न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.