- जयेश निरपळ गंगापूर (छत्रपती संभाजीनगर): साडे नऊ हजार रुपये व महत्त्वाच्या कागदपत्रांसह रस्त्यावर सापडलेले पैशाचे पॉकेट संबंधिताचा शोध घेऊन परत केल्याची घटना वाळूज औद्योगिक वसाहतीत शनिवारी(२३) रोजी दुपारी घडली. मानव संसाधन विभागात कामाला असलेल्या एका कंपनी कर्मचाऱ्याच्या या खऱ्या माणुसकीची दिवसभर परिसरात चर्चा होती.
सध्याच्या काळात लोकांमध्ये माणुसकी राहिलेली नाही असं सहज बोलता बोलता बोललं जातं. परंतु, आजच्या जमान्यातही काही लोकांमध्ये हा प्रामाणिकपणा टिकून आहे. याचा प्रत्यय वाळूज औद्योगिक वसाहतीत एका प्रामाणिक कर्मचाऱ्याच्या कृतीतून दिसून आला. अशोक वानखेडे(५२, रा.मुढाना ता.महागाव जि.यवतमाळ ह.मु.वाळूज ) असे पैश्यासह पाकीट परत करणाऱ्या प्रामाणिक व्यक्तीचे नाव आहे.
अशोक वानखेडे हे वाळूज औद्योगिक परिसरात एका कंपनीत मानव संसाधन विभागात कामाला आहेत. शनिवारी दुपारी रेणुका माता मंदिर परिसरात एका इंटरनेट कॅफेसमोर त्यांना एक पॉकेट आढळून आले. दुचाकी थांबवून पॉकेट उचलून पाहिले असता त्यात मोठी रक्कम असल्याचं लक्षात आलं. तसेच त्यात काही महत्वाची कागदपत्र होती.
आधार कार्डहून लागला तपासवानखेडे यांना पॉकेटमध्ये आधार कार्ड मिळून आले. ज्यावर योगेश लोंढे (रा.दिवशी पिंपळगाव ता.गंगापूर ) असा पत्ता होता. यावरून कंपनीतील सहकारी गंगापूर तालुक्यातील अविनाश निकम व बाजूला असलेले दुकान मालक प्रवीण गायकवाड यांच्या मदतीने दिवशी पिंपळ येथील कुणाल वावरे यांना फोन करून योगेश लोंढे यांचा फोन क्रमांक मिळविला. त्यानंतर लोंढेंना संपर्क करून त्यांच्याकडे पॉकेट सुपूर्द केले. पॉकेटमध्ये साडेनऊ हजार रुपये रोख आणि कागदपत्रे होती. वानखेडे यांच्या प्रामाणिकपणाचे कोतूक होत आहे.