पैठण: अवैध गुटखा विक्री करणाऱ्यास पकडून कायदेशीर कारवाई करण्याऐवजी त्याच्याशी तडजोडकरून २५ हजार रूपये घेऊन परस्पर सोडून देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यास पोलीस अधिक्षकांनी तातडीने निलंबीत केले आहे. सचिन भुमे असे त्याचे नाव असून पैठण उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात चालक या पदावर तो कार्यरत आहे. विशेष म्हणजे भुमे याने गुटखा विक्रेत्याकडून लाचेची रक्कम फोन पे वर स्विकारल्याची चर्चा होत आहे.
याबाबतच्या आदेशानुसार, बुधवारी पैठण पाचोड रोडवर सचिन भुमे याने पाचोड येथील गुटखा विक्रेत्यास पकडून कारवाईचा धाक दाखवत त्याच्याकडून २५ हजार रूपये स्विकारले व त्यास परस्पर सोडून दिले. वास्तविक एक जबाबदार पोलीस अंमलदार असल्याने याबाबत वरिष्ठांना माहिती देऊन भुमे याने सदर गुटखा विक्रेत्यास ताब्यात घेऊन नियमानुसार कायदेशीर कारवाई करणे अपेक्षीत होते. मात्र, तसे न करता गुटखा विक्रेत्याशी तडजोड व आर्थीक व्यवहार करून परस्पर सोडून दिल्याची विश्वसनीय सुत्रांकडून माहिती मिळाली आहे.
भुमे याची कृती अत्यंत गंभीर स्वरुपाची असून पदाचा गैरवापर केल्याचे सकृत दर्शनी दिसून येत असल्याने निलंबित करण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे. या प्रकरणी सचिन भुमे याच्या विरोधात प्राथमिक चौकशीची कारवाई करण्यात येत असून सदर प्राथमिक/विभागीय चौकशीच्या अहवालानुसार अंतिम निर्णय घेण्यात येईल असे आदेशात म्हंटले आहे.