छत्रपती संभाजीनगर : छावणी पोलिस ठाण्यात दाखल अदखलपात्र गुन्ह्यात घटनास्थळाची पाहणी करून आरोपीस पाबंद करण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्यावर आरोपीने चाकु हल्ला केला. ही घटना ९ मे रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास छवणीतील गवळीपुऱ्यात घडली. या प्रकरणी आरोपीच्या विरोधात शासकीय कामकाजात अडथळा, जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदविल्याची माहिती निरीक्षक कैलास देशमाने यांनी दिली.
रोहन नारायण येरले (रा. गवळीपुरा, छावणी) असे आरोपीचे नाव आहे. फिर्यादी पोलिस कर्मचारी केशव काळे हे अदखलपात्र गुन्ह्यातील घटनास्थळावर पाहणी करण्यासाठी ठाण्यात नोंद करून गेले होते. अदखलपात्र गुन्ह्यातील आरोपी राेहन येरले यास पाबंद घालण्यासाठी काळे हे १. ४५ वाजता घटनास्थळी पोहचले. त्याठिकाणी तक्रारदार राजु मित्रे व त्यांच्या पत्नीकडे पोलिस कर्मचारी काळे हे चौकशी करीत असतानाच त्यांचा जावाई आरोपी रोहन येरले हा शिवीगाळ करीतच आला. त्यास काळे यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याने आमचे फॅमिली मॅटर आहे. तुम्ही मध्ये येऊ नका असे बाेलुन त्याने उजव्या पायाच्या पोटरीला लावलेला चाकु काढुन काळे यांच्यावर हल्ला केला. काळे यांनी चतुराई दाखवत येरले यास पकडत,पोलिस निरीक्षक देशमाने यांना घटनेची माहिती दिली. त्यांनी तात्काळ पीटर मोबाईलचे चार पोलिस कर्मचारी घटनास्थळी पाठवले. तोपर्यंत आरोपीस काळे यांनी पकडून ठेवले होते. तोपर्यंत तो पोलिसांना शिविगाळ करीतच होता. पोलिसांनी पकडून त्यास पोलिस ठाण्यात आणले. त्याठिकाणी त्यांच्यावर जिवे मारण्याचा प्रयत्न, शासकीय कामकाजात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंदवला. अधिक तपास निरीक्षक कैलास देशमाने करीत आहेत.
सलग दुसऱ्या दिवशी पोलिसावर हल्लाहर्सूल कारागृहात खूनाच्या गुन्ह्यात असलेल्या तीन आरोपींनी घरचे जेवण, तंबाखूसह इतर साहित्यासाठी न्यायालयाच्या आवारातच पोलिसांवर हल्ला केल्याची घटना ८ मे रोजी घडली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी छावणीत पोलिस कर्मचाऱ्यावर आरोपीने हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे.