- नितीन कांबळेकडा (बीड) : शेवगावला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने दोन विवाहित बहिणी पैकी एका गर्भवती महिलेवर अत्याचार केल्याची घटना नांदुरफाटा ते अंमळनेर रोड दरम्यान मंगळवारी ( दि. १३ ) रात्री साडेआठच्या दरम्यान घडली आहे. अंमळनेर पोलिस ठाण्यात पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून दि. १४ रोजी पहाटे तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाटोदा तालुक्यातील एक गावात आईला भेटण्यासाठी शेवगाव येथून २ विवाहीत बहिणी आल्या होत्या. मंगळवारी रात्री आईला भेटून दोघी शेवगावला जाण्यासाठी निघाल्या. डोंगरकिंन्ही मार्गावर नांदुरफाटा येथे वाहनांची वाट पहात थांबल्या असता एका वाहन थांबले. तुम्हाला शेवगावला सोडतो म्हणून चालकाने दोघींना वाहनात बसवले. यावेळी गाडीत पूर्वीच तिघे बसलेले होते. थोडे पुढे गेल्यानंतर त्यातील एकाने दोन्ही बहिणी पैक्की २५ वर्षीय गर्भवती महिलेवर अत्याचार केला. त्यानंतर दोघींना रस्त्यावर सोडून तिघे फरार झाले.
दरम्यान, पिडीतेने अंमळनेर पोलिसांना फोन करून आपबिती सांगितली. पोलिसांनी लागलीच पिडीतेने सांगितलेल्या ठिकाणी धाव घेतली. त्यानंतर पिडीत महिलेला अंमळनेर आरोग्य केंद्रात तपासणीसाठी आणले. पुढील वैद्यकिय चाचणीसाठी पिडीतेस बीडच्या शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पुढील तपास पिंक पथकाच्या पोलीस उपनिरीक्षक राणी सानप यांच्याकडे वर्ग करण्यात आल्याचे अंमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार ठोंबरे यांनी लोकमतला सांगितले.