छत्रपती संभाजीनगर : कृषी विभागाच्या मालकीच्या शहानूरवाडी येथील सुमारे २० हजार चौरस मीटर जागेवर कृषी भवन उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाने पत्राद्वारे सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले.
मागील सप्ताहात येथे रूजू झालेले विभागीय कृषी सहसंचालक तुकाराम मोटे यांनी येथे रूजू झाल्यांनतर विविध फायलींचा आढावा घेतला. यावेळी सहकार विभागाने कृषी सहसंचालक कार्यालयाची इमारत सोडण्यासाठी नोटीस बजावल्याचे समजले. तेव्हा त्यांनी राज्यातील अन्य विभागीय स्तरावरील कार्यालयांच्या धर्तीवर छत्रपती संभाजीनगर येथेही कृषी भवनची वास्तू उभारणे गरजेचे असल्याचे शासनास कळविले. तेथे शहरातील विविध १२ कार्यालये एकाच छताखाली आणली जाऊ शकतात. यानंतर त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता यांची भेट घेऊन शहानूरवाडी येथील कृषी विभागाच्या मालकीची सुमारे २० हजार चौरस मीटर जमीन उपलब्ध असल्याचे सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभागानेही या कृषी भवन इमारतीचा डीपीआर तयार करण्यासाठी मोजमाप सुरू केल्याचे विभागीय कृषी सहसंचालक मोटे यांनी सांगितले. येत्या काही दिवसांत याबाबतचा प्रस्ताव तयार होईल आणि कृषी मंत्र्यांकडूनही यासाठी पुढाकार घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
एकाच छताखाली येतील १२ कार्यालयेकृषी विभागाची शहरात विविध ठिकाणी कार्यालये किरायाच्या इमारतीमध्ये आहेत. क्रांतीचौक येथील विभागीय कृषी संचालक कार्यालय सहकार विभागाच्या जागेवर, तर तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी यांची कार्यालये गारखेडा परिसरातील महापालिकेच्या इमारतीत आहेत. शहानूरवाडी येथे जिल्हा कृषी अधीक्षक, उपविभागीय कृषी अधिकारी, आत्मा संचालक कार्यालय, जैविक कीड नियंत्रण प्रयोगशाळा, बीज परीक्षण कार्यालय, माती परीक्षण कार्यालय अशी वेगवेगळी १२ कार्यालये कृषी भवनमध्ये एकाच छताखाली आणली जातील.