- मुजीब देवणीकरछत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे आता बदलू लागली आहेत. निवडणुकीच्या प्रारंभी मतदारसंघातील लढत शिंदेसेना विरुद्ध एमआयएम अशी होईल, असे वाटत होते. आता शिंदेसेना आणि उद्धवसेनेची नजर मुस्लिम-दलितबहुल भागातील ‘वंचित’च्या उमेदवाराकडे लागली आहे. एमआयएम २०१४ सारखा मतविभाजनाचा करिष्मा होईल या आशेवर असून, शिंदेसेना आणि उद्धवसेनेचे उमेदवार समान प्रमाणात चालले तरच आपली लॉटरी लागू शकते, असे त्यांना वाटत आहे.
मध्य मतदारसंघातील मतदारांचा कौल जाणून घेणे एवढे सोपे नाही. हिंदू-मुस्लिम भागात मतदार अत्यंत सायलेंट आहेत. या मतदारसंघाचा इतिहासही अत्यंत रंजक आहे. २०१४ मध्ये मतदारसंघात सेना-भाजपा आमनेसामने होते. त्यामुळे किशनचंद तनवाणी आणि प्रदीप जैस्वाल यांच्यात हिंदू मतांचे विभाजन झाले. त्याचा फायदा ‘एमआयएम’ने उचलला होता. २०१९ मध्ये हिंदू मतदारांनी एकत्र कौल जैस्वाल यांच्या बाजूने दिला. त्यामुळे एमआयएमचा पराभव झाला. २०२४ मध्ये पुन्हा एकदा २०१४ सारखा राजकीय ट्रँगल निर्माण होतोय. मतविभाजनाच्या मुद्द्यावर किशनचंद तनवाणी यांनी उद्धवसेनेची उमेदवारी परत केली. उद्धवसेनेने तत्काळ बाळासाहेब थोरात यांना उमेदवारी देऊन डॅमेज कंट्रोल केले. थोरात यांचे हर्सूल, सिडको भागांत चांगले नेटवर्क आहे.
कोणाचे लक्ष कोणाकडे?मुस्लिम मते ८० ते ८५ टक्के मिळाली तर विजय पक्का, असा दावा ‘एमआयएम’कडून केला जात आहे; तर मुस्लिम मतांना खिंडार पाडण्यासाठी ‘वंचित’चे उमेदवार मेहनत घेत आहेत. दुसरीकडे, शिंदेसेनेचे उमेदवार प्रदीप जैस्वाल आणि उद्धवसेनेचे उमेदवार बाळासाहेब थोरात यांची मदार हिंदू मतांवर असून, जास्तीत जास्त मते मिळावीत, यासाठी दोघेही प्रयत्नशील आहेत. हिंदू मतांच्या विभागणीवर एमआयएमची भिस्त आहे.