औरंगाबाद : स्थळ - खडकेश्वर महादेव मंदिर प्रांगण... वेळ सायंकाळची... देखावा सुरु होतो... ‘सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम... ३७ वर्षांची परंपरा लाभलेल्या बजाज ऑटो कामगार व कर्मचारी बंधूंचे न्यु शिवशक्ती गणेश मित्रमंडळातर्फे स्वागत...’, असे म्हणत असतानाच रंगमंचावर भारत माता प्रकटते... आणि थेट गणेशभक्तांशी संवाद साधते... ‘मातृभूमी, भारतमाता म्हणजेच सर्वात प्राचीन, प्रगत संस्कृती’... असे म्हणत भारत माता देशाच्या स्वातंत्र्याच्या मागील ७५ वर्षातील प्रगतीचा आढावा सादर करते. तेही अवघ्या ३.३० मिनिटांत.‘आपण भारतीय आहोत, त्याचा आपल्याला अभिमान आहे. आपण असे काम करुया, देशाला आपला अभिमान वाटला पाहीजे’, अशी साद घातली जाते. देखावा पाहून प्रत्येक जण भारावून जातो, ‘भारत माता की जय’, वंदे मातरम’ अशा जयघोष देत गणेशभक्त मंडपातून बाहेर पडतात.
यांत्रिकी स्वयंचलित देखाव्याने उपस्थितांची मने जिंकली... कोरोनाची मागील दोन वर्षे वगळता मागील ३७ वर्षांत न्यू शक्ती गणेश मंडळाने देशातील घटना - घडामोडींवर आधारित भाष्य करणारे यांत्रिकी करामतीद्वारे देखावे सादर केले आहेत. यंदाच्या देखाव्यात ‘अमूल्य भारत, अतूल्य भारत, बलशाली भारत’ हा सामाजिक प्रबोधनपर यांत्रिकी स्वयंचालित देखावा सादर केला आहे. इंग्रज राजवटीच्या जोखडातून मुक्त झालेल्या आपल्या देशासमोर अनेक आव्हाने होती. त्यांना तोंड देत तिथपासून ते अमृतमहोत्सवी वर्षापर्यंत देशाची झालेली प्रगती यात दाखविण्यात आली आहे. कृषी, शिक्षण, आरोग्य, दळणवळण आणि क्रीडा क्षेत्रातील प्रगतीचा आढावा मांडण्यात आला आहे. सैनिकांची परेड, विक्रांत यौद्धनोका, ब्राम्होस, वंदे मातरम स्तंभा आवती-भोवती दुचाकीवर उभे राहून सलामी देत फेऱ्या मारणारा जवान, अशा अनेक घटना आपणास बघण्यास मिळतात. या देखाव्याचे उद्घाटन शुक्रवारी सायंकाळी करण्यात आले. सर्वांसाठी हा देखावा पुढील ६ दिवस सुरु राहणार आहे.
आजी - माजी कामगारांच्या एकजुटीचे दर्शनयांत्रिकी स्वयंचलित देखावा तयार करण्यासाठी मागील १५ दिवसांपासून बजाज कंपनीतील कामगार परिश्रम घेत आहेत. एवढेच नव्हे जे कामगार मागील काही वर्षात निवृत्त झाले तेही देखावा तयार करण्यात आपले योगदान देत आहेत. यातून कामगारांच्या एकजुटीचे दर्शन घडत आहे.