औरंगाबाद : मद्य उत्पादक कंपनीतील सेल्समनने मद्य विक्रीचे पैसे उचलून तब्बल १० लाख ४१ हजार ६३० रुपयांचा कंपनीला गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. ही घटना चिकलठाणा एमआयडीसीतील मैत्री स्पीरिट प्रा. लि. कंपनीत १ जून ते ११ नोव्हेंबर या काळात घडली. कंपनी मालकाच्या तक्रारीवरून एमआयडीसी सिडको ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.
प्रशांत दिलीप रुपेकर (३०, रा. शिवविहार, शेंद्रा) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. कंपनीचे मालक हिरासिंग त्रिलोकसिंग सेठी ( रा. प्लॉट क्र. २१७, बी सेक्टर, एन-१, सिडको) यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या दोन कंपन्या असून चिकलठाणा एमआयडीसीत मैत्री स्पीरिट प्रा. लि. कंपनी आहे. या कंपनीत सहा वर्षांपासून प्रशांत रुपेकर हा सेल्समन म्हणून कामाला आहे. त्याच्याकडे वाळूज, गारखेडा, मुख्य बसस्थानक, कन्नड आदी ठिकाणी व्यावसायिकांना कंपनीचे मद्य विक्री करण्याचे काम होते. व्यावसायिकांना मद्य पुरवठा केल्यावर त्याची प्रिंट देणे आणि रोख किंवा धनादेशाच्या स्वरुपाने आलेले पैसे कंपनीतील कॅशियरकडे जमा करावे लागत हाेते. आरोपी प्रशांतने १ नोव्हेंबर रोजी जय भवानी हॉटेलचा मालक परमेश्वर खाडे यांना मद्य पुरवठा करून एक लाख रुपये घेतले. ही रक्कम त्याने कंपनीत भरली नाही. याबाबतची माहिती कंपनीचे व्यवस्थापक दर्शन भाकरे यांनी मालक सेठी यांना दिली.
त्यानंतर प्रशांतच्या अपहाराचा पर्दाफाश झाला. ताे ज्या भागाचा सेल्समन होता त्या भागात भाकरे यांनी चौकशी केल्यानंतर प्रभू हॉटेल एक लाख ९० हजार १५४ रुपये, चिल्ड बिअर शॉपी १ लाख २५ हजार ६१३ रुपये, हॉटेल पटियाला पॅक १ लाख १० हजार रुपये, हॉटेल राजकमल १ लाख ३२ हजार ६८० रुपये, विश्व वाईन हॉटेल १ लाख १८ हजार ६७० रुपये, हॉटेल आदित्य ५३ हजार २३० रुपये, पवन हॉटेल १ लाख रुपये, हॉटेल साई रेस्टॉरंट ८३ हजार रुपये, कोल्ड रॉक बिअर शॉपी ५० हजार रुपये आणि रायगड हॉटेल ७४ हजार ५७८ अशा दहा व्यावसायिकांकडून १० लाख ४१ हजार ६३० रुपये उचलून अपहार केल्याचे उघड झाले. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक आत्माराम घुगे अधिक तपास करीत आहेत.
आरोपीस अटक, चार दिवसांची पोलीस कोठडीआरोपी प्रशांत रुपेकर यास तपास अधिकारी आत्माराम घुगे यांच्या पथकाने गुन्हा नोंदविल्यानंतर काही वेळातच अटक केली. त्यास मंगळवारी न्यायालयात हजर केले असता, चार दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आल्याचे निरीक्षक विठ्ठल पोटे यांनी सांगितले. दरम्यान, रुपेकर यास मालक सेठी यांनी कंपनीत बोलावून जाब विचारल्यानंतर त्याने पैशाच्या अपहराची कबुली दिली. तसेच आरोपीच्या पत्नीने विनंती केल्यामुळे शपथपत्र लिहुन घेत २० नोव्हेंबरपर्यंत पैसे परत करण्यासाठी मुदतही दिली होती. मात्र, दिलेल्या मुदतीत पैसे मिळाले नसल्यामुळे गुन्हा नोंदविण्याचा निर्णय घेतला.