छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या अध्यक्षपदी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मर्जीतले अर्जुन गाढे पाटील यांची बिनविरोध निवड झाली. पण, पडद्यामागे बऱ्याच गोष्टी घडल्या. नाराजी नाट्यातून दुसऱ्या ‘गुवाहाटी’ची शक्यता होती. पण, तो डाव अब्दुल सत्तार यांच्या नजरेतून न सुटल्याने त्यांनीच तो उधळून लावला.
तीन दिवसांपासून जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या चर्चेसाठी बैठकांवर बैठका चालूच होत्या. रविवारी रात्री संचालकांसह बैठक झाली. सोमवारी सकाळीही संचालकांची सुभेदारीवर बैठक झाली. अब्दुल सत्तार यांनी गाढे पाटलांचे नाव जाहीर केले. खरं तर अनेक संचालक अध्यक्ष होण्यासाठी इच्छुक होते. अगदी बाशिंग लावून बसले होते. त्यांच्या या स्वप्नावर पाणी पडले. टप्प्याटप्प्याने का होईना; अध्यक्षपद दिले जावे, असेही अनेकांना वाटत होते. चिठ्ठी टाकून अध्यक्ष निवडावा, असाही मतप्रवाह होता. परंतु, मग चिठ्ठीत कोणतेही नाव निघाले असते.
इच्छुकांपैकी एक कृष्णा पाटील डोणगावकर हे आपल्या गाडीत नितीन पाटील, जगन्नाथ काळे, किरण पाटील डोणगावकर असे पाच-सहा संचालक सुभेदारी गेस्ट हाउसवरून जिल्हा बॅंकेच्या दिशेने निघतील, ही अपेक्षा होती. परंतु, ही मंडळी काही तरी गडबड करतील, असे लक्षात आल्यावर सत्तार यांनी कृष्णा पा. डोणगावकर व नितीन पाटील यांना त्या गाडीतून उतरवले व स्वत:च्या गाडीत घेतले. आणि कथित दुसरी ‘गुवाहाटी’ टळली. किंबहुना ती सत्तार यांनीच उधळून लावली. काय ते समजून गेलो होतो, म्हणजे मला अध्यक्ष करणार नाहीत, असे कृष्णा डोणगावकर म्हणाले. ‘नाही तर दुसरी गुवाहाटी घडली असती’, असेही ते म्हणाले. प्रत्यक्षात गुवाहाटीला जावे लागले नसते, पण एकनाथ शिंदे यांच्यामुळे जो उठाव घडला, तसे काही तरी घडवायचे, असे शिजत होते, असे म्हणायला वाव आहे. मग तो लोकप्रिय डायलॉग ‘काय ती झाडी, काय ते हाटील, एकदम ओके...’ याचीही आठवण झाली असती !