छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणासाठी राज्यव्यापी आंदोलन उभे केलेल्या मनोज जरांगे यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी मुकुंदवाडीत काही काळ तणाव निर्माण झाला होता. मंगळवारी रात्री ११.३० वाजता ही घटना घडली. संतप्त जमावाने ही पोस्ट करणाऱ्या दीपक बद्री नागरे (३५, रा. मुकुंदवाडी) याला घरातून बाहेर काढून मारहाण करून ठाण्यात नेले.
मंगळवारी रात्री मुकुंदवाडीत अचानक एक पोस्ट व्हायरल झाली. नागरे याने जरांगे यांच्याविषयी एका ओळीची आक्षेपार्ह पोस्ट व्हॉट्सॲप स्टेटसला ठेवली. काही वेळातच त्याचे स्क्रीनशॉट वाऱ्यासारखे व्हायरल झाले. जवळपास २०० ते २५० चा जमाव जमला. हा प्रकार करणाऱ्या नागरेचे घर शोधून काढून नागरिकांनी त्याला घरातून बाहेर आणून मारहाण केली. स्थानिक पदाधिकारी ज्ञानेश्वर डांगे, हनुमान शिंदे, नवनाथ डांगे, सतीश जगताप, संतोष शेळके, किशोर ठुबे, अमर जगताप, बाळू लोंढे यांनी धाव घेत जमावाला शांत करत नागरेला ठाण्यात नेले.
दुपारी भेटून आला अन्..प्राथमिक माहितीनुसार नागरे मंगळवारी दुपारी जरांगे यांना भेटून आला होता. त्यांच्यासोबत सेल्फी देखील काढला. सायंकाळी त्यांच्यासोबतचा सेल्फी पोस्ट करत त्याच्यावर आक्षेपार्ह मजकूर लिहिला. नवनाथ डांगे यांच्या फिर्यादीवरून याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती, असे निरीक्षक शिवाजी तावरे यांनी सांगितले.