छ. संभाजीनगर - शिवसेना उबाठा गटाचे आमदारआदित्य ठाकरेंनी मंत्र्यांच्या परदेश दौऱ्यावरुन टीका करत सरकारला लक्ष्य केलं. राज्य सरकारमध्ये अनेकांना परदेश दौरा करायला आवडते. परदेश दौरे म्हणजे सुट्टी समजायला लागेल आहेत. तुम्हाला कुठे जायचे तिथे जा; पण जनतेच्या पैशांवर परदेशवारी नको, अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांसह, विधानसभा अध्यक्ष व अन्य मंत्र्यांच्या परदेश दौऱ्यावर निशाणा साधला. आदित्य ठाकरेंच्या या टीकेनंतर भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाकडून आदित्य यांच्यावर बोचरी टीका करण्यात येत आहे. आदू बाळ म्हणत त्यांना हिनवलं जातंय. आता, आदित्य यांनी त्यावरही पलटवार केला आहे.
मुंबईतील मातोश्री निवासस्थानी पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्र्यांवर निशाणा साधला. अवकाळी पावसामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांचा दौरा रद्द केलेला नाही. मुख्यमंत्री जर्मनीला जाऊन हायवे पाहणार होते. त्यांच्याकडे इतकी वर्षे एमएमआरडीएचे खाते आहे. मग, आता तिथे जाऊन काय हायवे बघायचे? असा सवाल त्यांनी केला. तसेच, फडणवीसांच्या जपान दौऱ्यावर आणि उद्योगमंत्र्यांच्या विदेश वारीवरही टीका केली. त्यानंतर, भाजपाचे नेते आदित्य ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल करत आहेत. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह अनेक भाजप नेते व आमदारांनी त्यांच्यावर टीका केलीय. आता, या टीकेला आदित्य यांनी प्रत्त्युतर देताना ही नवी भाजपा आहे का, असा सवालही केलाय.
''एका आदू बाळाने ह्यांना केवढं सळो की पळो केलं हे दिसतंय. देशात एक पप्पू नाव ठेवलेलं, त्यांनी ह्यांना हलवून ठेवलेलं आणि इकडे आदू बाळ. माझ्या नावात बाळ लावलं याचा मला अभिमान आहे. कारण, माझ्या आजोबांचं नावही बाळच होतं. मात्र, त्यांच्या भाषेतून त्याचं फ्रस्टेशन आणि चीफ विचार दिसून येतात,'' असा पलटवार आदित्य ठाकरेंनी विरोधकांवर केला आहे. ''आम्ही जी भाजपा पाहायचो ती वाजपेयी साहेबांची होती, अडवाणीजींची होती. आता ही नवी भाजपा आहे का, ही भाषा नव्या भाजपाची आहे का?,'' असा सवालही आदित्य ठाकरेंनी विचारला आहे. छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांशी संवाद साधतना आदित्य ठाकरे बोलत होते.
काय म्हणाले होते शेलार
वडील आजारी असताना सरकारी पैशांवर लंडनमध्ये मजा मारणाऱ्याने दुसऱ्यांना शहाणपण शिकवायचे नसते, अशी टीका भाजपचे आमदार आशीष शेलार यांनी केली.
राणेंची बोचरी टीका
भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्विट करुन प्रत्युत्तर दिले आहे. 'बाबा आजारी असताना सरकारी पैशातून Voice थेरेपी करत होता आणि कोणत्या कोकिळेसोबत सूर आवळत होता त्यामूळे आल्यावर आई कशी रागवली हा सर्व खराखुरा तथ्यात्मक कंटेट मांडू शकतो. त्यामुळे आपली फेक बोंबाबोम फेक्टरी तात्काळ बंद करा, असं ट्विट राणे यांनी केले आहे. यामुळे आता पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू होणार असल्याचे बोलले जात आहे.