सिल्लोड: तालुक्यातील निल्लोड फाट्यावर वळण रस्त्यावर दुचाकीस कारने पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीस्वार आणि मुलगा गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात आज, बुधवारी दुपारी १ वाजता जळगाव ते छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर निल्लोड फाट्यावर झाला.
सिल्लोड येथील जावेद भिकन बागवान हे दुचकीवरून पत्नी शाबानाबी जावेद बागवान आणि मुलगा अमर जावेद बागवान यांच्यासोबत छत्रपती संभाजीनगर येथून सिल्लोडकडे येत होते. दुपारी १ वाजेच्या दरम्यान निल्लोड फाट्यावर वळण रस्त्यावर बागवान यांच्या दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या भरधाव कारने जोरदार धडक दिली. यात शाबानाबी जावेद बागवान ( ४८) यांचा जागीच मृत्यू झाला. तर जावेद भिकन बागवान आणि अमर जावेद बागवान हे पितापुत्र गंभीर जखमी झाले.
दरम्यान, याचवेळी छत्रपती संभाजीनगर येथून सिल्लोडकडे येत असलेले माजी नगराध्यक्ष अब्दुल समीर यांना अपघात निदर्शनास आला. त्यांनी रुग्णवाहिकेतून अपघातग्रस्त जखमींना सिल्लोड येथील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. तर अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेला सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. यावेळी अक्षय मगर,राजू गौर,अकिल देशमुख यांनी जखमींना मदत केली.