छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान करणे भाजपा नेते संजय केणेकर यांना चांगलेच भोवले आहे. शुक्रवारी मराठा मावळा संघटनेने केनेकरविरोधात गुन्हा नोंदविण्यासाठी पोलीस ठाण्यात ठिय्या दिला. तर आज दुपारी आक्रमक मराठा कार्यकर्त्यांनी केनेकर यांच्या कार्यालयावर धाव घेत तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी आधीच धाव घेतल्याने कार्यालय सुरक्षित राहिले.
मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील हे सतत भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करीत असतात. याचा राग मनात धरून भाजपा नेते संजय केणेकर यांनी दोन दिवसापूर्वी पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांचा डीएनए तपासावा लागेल असे विधान केले होते. या विधानाचे तीव्र पडसाद मराठा समाजात उमटत आहेत. काल मराठा संघटनेने सिडको पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले होते. तर आज आक्रमक मराठा कार्यकते थेट केनेकर यांच्या कार्यालयावर धडकले. जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी केणेकर यांचे कार्यालयात तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला.
क्रांतीचौक येथील संजय केणेकर यांच्या कार्यालयावर चालून केलेल्या कार्यकर्त्यांमध्ये मंत्री अब्दुल सत्तार यांचे कट्टर समर्थक तथा फुलंब्रीतून इच्छुक असलेले शिंदे सेनेचे किशोर बलांडे पाटील, प्रा. आकाश सोळुंके, श्रीराम मस्के, भारत तुपे, बाबासाहेब डांगे, गणेश काळे, नंदू मोठे, शिवम जगताप, ईश्वर भोपे, विशाल भोकरे, प्रहार संघटनेचे सुधाकर शिंदे, कृष्णा गाडेकर आणि जगन्नाथ पवार आदी सहभागी होते.