छत्रपती संभाजीनगर : सीए श्वेता भारतीया हे नाव आज बांधकाम व्यावसायिकांच्या क्रेडाई महाराष्ट् संघटनेत गाजत आहे. कारण, त्या क्रेडाईच्या महाराष्ट्र वुमन विंगच्या अध्यक्षा आहेत. कार्यकर्तृत्वावर त्यांनी या पदापर्यंत मजल मारली आहे. प्रत्येक कुटुंबाला स्वत:चे हक्काचे घर असावे, यासाठी त्यांनी सीए असताना बांधकाम क्षेत्रात उडी घेतली आणि लोकांचे घराचे स्वप्न पूर्ण करीत १५० लोकांना रोजगारही मिळवून दिला.
श्वेता भारतीया व त्यांचे पती नवनीत भारतीया हे दोघेही सीए आहेत. त्यांचे सासर कन्नड. विवाहानंतर छत्रपती संभाजीनगरात सीएची प्रॅक्टिस सुरू केली. आधी भाड्याने घर व ऑफिस घेऊन स्थायिक झाले. २००७ साली त्यांनी स्वत:च्या जागेत ऑफिस सुरू केले. हळूहळू ओळखी वाढत गेल्या. अनेक कंपन्या, बँका व संस्थांचे लेखा परीक्षण त्यांनी केले. याच वेळी सासरच्यांसोबत वाळूज येथे प्लास्टिक मोल्डिंग फॅक्टरी सुरू केली. या कंपनीचे हिशेब व प्रशासनही त्या यशस्वीरीत्या बघत आहेत. लोकांना त्यांच्या स्वप्नातील घर मिळवून देण्यासाठी त्यांनी कन्स्ट्रक्शनबरोबर इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये दमदार पदार्पण केले. तीन गृहप्रकल्प उभारून २२० जणांना घर मिळवून दिले. या क्षेत्रात १५० लोकांना रोजगार मिळवून दिला.
येथेच न थांबता त्यांनी बांधकाम व्यावसायिकांची सर्वात मोठी शिखर संघटना क्रेडाई महाराष्ट्राच्या वुमन विंगच्या अध्यक्षपदापर्यंत मजल मारली. एकाच वेळी विविध पदांवर कार्य करीत असताना त्या घरी दोन मुले, सासू-सासरे यांच्याकडे तेवढेच लक्ष देत आहेत. मुले संस्कारक्षम असली तर ती स्त्रियांचा सन्मान करतील, असे त्यांचे म्हणणे आहे. एकाच वेळी विविध पातळीवर तेवढ्याच ऊर्जेने कार्य करणाऱ्या श्वेता भारतीया यांनी महिलांसमोर आदर्श निर्माण केला आहे.
सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रांतही छापश्वेता भारतीया या सीएमआयएच्या कार्यकारी सदस्यपदावरही कार्यरत आहेत. याशिवाय सांस्कृतिक क्षेत्रातील आघाडीची संस्था कलासागरच्या सहसचिव आहेत. याशिवाय विविध सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांना परीक्षक म्हणूनही निमंत्रित केले जाते. माहेर भंडारा जिल्ह्यातील तुमसर असलेल्या श्वेता यांनी अनोळखी शहरात येऊन विविध क्षेत्रांत ठसा उमटविला.