छत्रपती संभाजीनगर : बुधवारी अचानक बाजारपेठेत कण्हेरीचे पिवळे फूल खरेदी करण्यासाठी गर्दी वाढली होती. हे फूल कुठे मिळते का, याचा शोध घेत अनेक जण फिरत होते. एरव्ही कोणी या फुलाला विचारत नाही. पण बुधवारी १० रुपयांना ५ फुले विकली जात होती.
असे काय कारण घडले की, कण्हेरीच्या फुलांना अचानक मागणी वाढली. अधिक मासाचा बुधवारी शेवटचा दिवस होता. कण्हेरीचे फूल भगवान भोलेनाथ यांना खूप प्रिय आहे. मनोकामना पूर्ण करण्यासाठी शिवलिंगावर कण्हेरीचे फूल अर्पण करावे, असा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि सकाळपासूनच यासाठी भाविक घराबाहेर पडले. बाजारातही मोजक्या विक्रेत्यांकडेच ही फुले होती. लवकर सुकून जात असल्यामुळे ही फुले बाजारात एरव्ही विक्रीला येत नाहीत; पण बुधवारी विक्रेत्यांनी ही फुले आणली. विविध शिवमंदिरांत महिलांनी मोठी गर्दी केली होती. प्रत्येक महिला ही ५ फुले घेऊन शिवपिंडीची पूजा करून त्यावर कण्हेरीची फुले वाहत होती.
५० टन कोहळे विक्रीअमावस्येमुळे बाजारात मोठ्या प्रमाणात कोहळे विक्रीसाठी आले होते. घरावर, दुकानावर लटकाविण्यासाठी याचा उपयोग करण्यात येतो. ८० ते १०० रुपयांपर्यंत प्रतिनग कोहळे विक्री झाले. मागील दोन दिवसांत ५० टन कोहळे विक्री झाल्याची माहिती व्यापारी लक्ष्मण काथार यांनी दिली.