औरंगाबाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केलेला युवासेनेचा तत्कालीन पूर्व शहरप्रमुख ज्योेतीराम विठ्ठलराव धोंगडे हा बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार झाला आहे. मुकुंदवाडी पोलिसांनी त्याच्या घरासह इतर ठिकाणी त्याचा शोध घेतला, मात्र तो सापडला नाही.
ज्योतीराम धोंगडे याने एका विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवून चार वर्षे अत्याचार केले. तिच्याकडूनच दीड ते दोन कोटी रुपये उकळले. ज्योतीरामपासून राहिलेल्या तीन महिन्यांच्या गर्भावर त्याने लाथ मारली. त्यामुळे पीडितेच्या पोटातच गर्भाचा मृत्यू झाला. त्याच वेळी बंदुकीचा धाक दाखवून ‘राजकारणात असल्यामुळे तुझ्यासोबत लग्न करू शकणार नाही’, असे कॅनॉटमध्ये स्पष्ट केल्यामुळे पीडितेने मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. तक्रार येताच पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली. गुन्हा नोंदविण्याच्या वेळीच मुकुंदवाडी पोलिसांचे गुन्हे शोध पथक ज्योतीरामच्या घरी पोहोचले. गुन्हा दाखल होणार असल्याची कुणकुण लागताच मोबाईल बंद करून त्याने पोबारा केला. तो मुंबई, पुण्याच्या दिशेने गेला असावा असा अंदाज पोलिसांनी बांधला आहे. तसेच तो कोणाच्या संपर्कात आहे, त्याविषयीची तांत्रिक माहिती पोलीस गोळा करीत असल्याचेही सूत्रांनी सांगितले.
शिवसेनेत जोरदार चर्चाशिंदे गटात प्रवेश केलेल्या ज्योतीरामच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदविल्याची चर्चा शिवसेनेत जोरदारपणे करण्यात येत होती. त्याशिवाय ज्योतीरामची इतर प्रकरणेही चवीने चघळली जात आहेत. त्याचे इतर काही महिलांसह राजकारणी महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याची जोरदार चर्चा करण्यात येत आहे. त्यास अधिकृत दुजोरा पोलिसांकडून मिळालेला नाही.
मोबाईल बंद करून फरार मुकुंदवाडी ठाण्यात ज्योतीराम धोंगडे याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदविल्यानंतर ठाण्यातील विशेष पथक तत्काळ त्याच्या घरी पोहोचले होते. मात्र, कुणकुण लागताच त्याने मोबाइल बंद करून पोबारा केला. मुकुंदवाडी पोलिसांचे एक पथक त्यास पकडण्यासाठी रवाना केले आहे.- ब्रह्मा गिरी, निरीक्षक, मुकुंदवाडी.