छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी सकाळी १०.३० वाजता प्रशासकीय इमारतीसह परीक्षा भवनमधील विविध विभागांची पाहणी केली. त्यामध्ये अर्ध्यापेक्षा अधिक कर्मचारी वेळेवर हजर नसल्याचे दिसले. या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना कुलगुरूंनी संबंधित विभागप्रमुखांना दिल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी हे पदभार स्वीकारल्यापासून वेळेपूर्वीच कामकाजाला सुरुवात करतात. त्यामुळे अनेक संवैधानिक अधिकाऱ्यांनाही कुलगुरूंच्या येण्यापूर्वी यावे लागते. त्यामुळे सुरुवातीच्या काळात अनेक विभागांतील कर्मचारी, अधिकारी वेळेवर येत होते. विभागात थांबतही होते. मात्र, मागील काही दिवसांपासून पुन्हा 'पहिले पाढे पंचावन्न' असाच प्रकार सुरू झाला होता. त्यामुळे कुलगुरू डॉ. फुलारी यांनी सोमवारी सकाळी प्रशासकीय इमारतीत आल्यानंतर स्वत:च्या कार्यालयाच्या शेजारच्या विभागापासून संपूर्ण प्रशासकीय विभागांना भेट दिली. त्यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर, आस्थापनाचे उपकुलसचिव डॉ. गणेश मंझा यांची उपस्थिती होती.
कुलगुरूंनी प्रशासकीय इमारत संपल्यानंतर परीक्षा भवनकडे माेर्चा वळवला. त्या ठिकाणीही विभागांची पाहणी केली. तेव्हा अर्ध्यापेक्षा अधिक कर्मचारी, अधिकारी वेळेवर हजर नव्हते किंवा विभागातून इतर विभागांत गेलेले असल्याचे आढळून आले. यापूर्वीही १४ जून रोजी कुलसचिव डॉ. अमृतकर यांनी आढावा घेतला होता. तेव्हाही असाच प्रकार उघडकीस आला होता.
सायंकाळी घेतली अधिकाऱ्यांची बैठककुलगुरूंनी सकाळी दिलेल्या आकस्मिक भेटीमध्ये अनेक कर्मचारी, अधिकारी गैरहजर असल्याचे आढळले. त्यामुळे सायंकाळी कक्ष अधिकारी, सहायक कुलसचिव, उपकुलसचिव यांची उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीमध्ये गैरहजर किंवा विभागात हजर नसणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिल्याचे समजते.
बैठक घेऊन सूचना केल्या प्रशासकीय इमारत, परीक्षा भवनमधील विभागांना कुलगुरूंनी सोमवारी सकाळी भेटी दिल्या. काही बाबी आढळल्यामुळे सायंकाळी बैठक घेऊन संबंधितांना सूचना केल्या. त्यामुळे सुधारणा होईल.- डॉ. प्रशांत अमृतकर, कुलसचिव