छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न असलेल्या विधि महाविद्यालयातील अभ्यासक्रमांच्या परीक्षांना मंगळवारपासून सुरुवात होत आहे. त्यापूर्वीच भावी वकिलांची कसोटी सुरू झाली आहे. अनेक विद्यार्थी मागील सत्रात नापास झाल्यामुळे त्यांनी रिचेकिंगसाठी अर्ज केले होते. त्याचा निकाल लागलेला नाही. तसेच अनेकांचा निकाल राखीव ठेवण्यात आला होता. त्याविषयीचा निर्णय परीक्षेच्या पूर्वसंध्येपर्यंत समोर आला नसल्यामुळे विद्यार्थी चिंतित आहेत.
विद्यापीठाच्या परीक्षा संचालक डॉ. भारती गवळी म्हणाल्या, निकाल राखीव ठेवलेल्या विद्यार्थ्यांचा प्रश्न निकाली काढण्यात आला आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी पुनर्तपासणीसाठी अर्ज सादर केले आहेत त्यांनी पुनर्परीक्षेसाठी अर्ज केलेला असेल तर त्यांनी परीक्षा द्यावी, ज्या परीक्षेत जास्त मार्क असतील ती ग्राह्य धरली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. फार्मसी आणि विधि अभ्यासक्रमांच्या अनेक विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले होते. त्या विद्यार्थ्यांच्या राखीव निकालाचा निर्णय घेण्यात आलेला नव्हता. त्याचवेळी नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकांची फोटो कॉपी मिळण्यासाठी अर्ज केले होते. मात्र, त्या मिळालेल्या नाहीत. त्यामुळे रिचेकिंगचा निकालही जाहीर झालेला नाही. त्यामुळे पुनर्परीक्षेसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यायची की नाही, याविषयी विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संदिग्धता आहे.
ज्या पेपरला अधिक मार्क, ते ग्राह्य धरण्यात येतीलयाविषयी परीक्षा संचालक डॉ. भारती गवळी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी राखीव निकाल ठेवलेल्या विद्यार्थ्यांचा प्रश्न निकाली काढला आहे. तसेच फार्मसीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन ऑनलाइन झालेले असल्यामुळे त्यांना फोटो काॅपी देण्यात येत नाही. विधि अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांनी फोटोकॉपी अर्ज केलेला असेल तर त्या संबंधित विद्यार्थ्यांच्या प्राचार्यांच्या लॉगिनमध्ये आहेत. त्यामुळे त्या ठिकाणाहून त्यांना त्या मिळू शकतात. तसेच विद्यार्थ्यांनी अर्ज भरलेला असेल तर परीक्षा द्यावी, ज्या परीक्षेत सर्वाधिक मार्क आहेत, ते ग्राह्य धरण्यात येतील. त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे नुकसान होणार नसल्याचेही डॉ. गवळी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.