श्यामकुमार पुरेसिल्लोड: अजिंठा लेणीच्या समोरील (व्ह्यू पॉईंट) धबधब्याच्या ठिकाणी सेल्फी काढण्याच्या नादात एक पर्यटक थेट पाय घसरून दोन हजार फूट खोल कुंडात पडला. बचाव पथकाने शर्थीचे प्रयत्न करुन त्या तरुणाला बाहेर काढले. पोलीस व पुरातत्व विभागाच्या कर्मचाऱ्यांमुळे त्या तरुणाचे प्राण वाचवले. ही घटना रविवारी दुपारी १.३० वाजता घडली.
कुंडात पडलेल्या पर्यटकांचे नाव गोपाल पुंडलिक चव्हाण(वय ३० वर्ष रा.नांदातांडा ता. सोयगाव) असे आहे. हा पर्यटक त्याच्या जळगाव जिल्ह्यातील चार मित्रासह लेणी बघायला आला होता. सकाळी अजिंठा लेणी बघून झाल्यावर तो सेल्फी काढण्यासाठी मित्रासोबत सप्त कुंड असलेल्या अजिंठा लेणीच्या धबधब्याच्या वर गेला. यावेळी सेल्फी काढण्याचा प्रयत्नात तो दोन हजार फूट खोल असलेल्या सप्त कुंडात पडला.
त्याला पोहता येत असल्याने त्याने कसे तरी कुंडाच्या एका कापरीचा सहारा घेतला व दगडाला पकडून आपला जीव वाचवला. माहिती मिळाल्यानंतर कुंडात पडलेल्या पर्यटकाला वाचवण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत मोरे, पोलीस कर्मचारी योगेश कोळी, विनोद कोळी निलेश लोखंडे व भारतीय पुरातत्व विभागाचे कर्मचारी भरत काकडे, मुकेश पुरे, संतोष दामोधर, सलीम शहा,शेख रईस, सुभाष दामोधर,सईद कादरी,शेख मुनाफ,शरीफ शहा,मनोज दामोधर, सुरक्षा गार्ड:- समाधान आगे,दिलीप देसाई,संदीप सपकाळ, अमोल बलांडे यांनी त्याला रेस्क्यू ऑपरेशन करून दोरीच्या साह्याने वर काढले.
सेल्फीचा मोह आवरेना...गेल्या आठ दिवसांपासून अजिंठा लेणी परिसरात झालेल्या पावसामुळे लेणीचा धबधबा ओसंडून वाहत आहे. यामुळे पर्यटक निसर्गाचा आनंद घेण्यासाठी धबधब्याजवळ जात आहे. हा धबधबा जवळपास दोन हजार फूट उंचावरून कोसळतो, यामुळे व्ह्यू पॉईंट जवळून पर्यटक थेट डोंगरावर जाऊन सेल्फी काढतात.
सेक्युरिटी गार्ड चे कुणी ऐकत नाही..जेथून धबधबा कोसळतो, तेथे पुरातत्व विभागाने पाईप लावून बेरिकेट केले आहे. तेथे सेक्युरिटी गार्डही आहे, मात्र त्या बेरिकेटमधून घुसून पर्यटक सेल्फी काढण्याचा प्रयत्न करतात यामुळे अशा घटना घडत आहे.
पर्यटकांनी स्वतः ला सांभाळावे..पर्यटकांनी लेणीचा व निसर्गाचा आनंद घ्यावा मात्र स्वतः चा जीव सांभाळावा...ज्यास्त जवळ जाऊन जीव धोक्यात घालू नये.-जे.एन. दिवेकर संवर्धन सहायक अजिंठा लेणी.