दौलताबाद : समृद्धी महामार्गावरून केमिकलची वाहतूक करणारा भरधाव ट्रक पुलाच्या दोन्ही बाजूंमधील पोकळीतून खाली पडून भीषण अपघात झाला. यात ट्रकने पेट घेतल्याने दोघांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी रात्री ११ वाजेच्या दरम्यान फतियाबाद गोकुळवाडी दरम्यान घडला. ट्रक चालक सोहेल खान इस्माईल खान (वय ३२) व नौशाद ऊर्फ लाला (वय २४, दोघेही रा. भीलई दुर्गुड, फरीदनगर, छत्तीसगड) अशी मयतांची नावे आहेत.
शुक्रवारी मुंबई येथून काही केमिकल व इतर साहित्य घेऊन ट्रक (क्र. सीजी ७-एडब्ल्यू ०५१८) नागपूरकडे जात असताना रात्री ११ वाजेच्या दरम्यान गोकुळवाडी (ता. गंगापूर) जवळील पुलाच्या दोन्ही बाजूंमध्ये असलेल्या पोकळीतून कठडे तोडून ट्रक सरळ १२ फूट खाली कोसळला. यावेळी मोठा आवाज होऊन ट्रकने पेट घेतला. आवाज झाल्याबरोबर गोकुळवाडी व परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, ट्रकने पेट घेतल्याने कोणाला काही करता आले नाही. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिस उपनिरीक्षक काकासाहेब नागवे, अशोक बर्डे व दौलताबाद पोलिस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी आले. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करून रात्री आग विझविली. मात्र, यात ट्रक चालक सोहेल इस्माईल खान व क्लीनर नौशाद हे दोघेही जळून ठार झाले. चालक सोहेल खान याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, ५ वर्षांचा मुलगा, २ वर्षांची मुलगी असा परिवार आहे, तर नौशादच्या पश्चात पत्नी, आई, वडील, २ महिन्यांची मुलगी असा परिवार असल्याची माहिती सोहेलचे सासरे फय्याज अहमद यांनी दिली.
दोन तासांच्या प्रयत्नांनी विझली आगट्रकने पेट घेतल्यानंतर ग्रामस्थांसह पोलिस कर्मचारी घटनास्थळी हजर झाले. मात्र, ट्रकमध्ये केमिकलचे ड्रम असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले होते. महामार्गावरील माळीवाडा, सावंगी व लासूर स्टेशन येथील अग्निशमन दलाला बोलावण्यात आले. पण त्या गाड्यांमध्ये पाणी नसल्याने छत्रपती संभाजीनगर येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. दोन तासांच्या अथक प्रयत्नांनी सदर आग विझविण्यात यश आले.