दावरवाडी (औरंगाबाद) : पैठण - पाचोड राज्य महामार्गावरील दावरवाडी डेरा फाट्याजवळ सिमेंटने भरलेला एक ट्रक पुलावरुन वीरभद्रा नदीच्या पात्रात कोसळला. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, सिमेंट व ट्रकचे मोठे नुकसान झाले.
कर्नाटक राज्यातील तांडोर येथून सिमेंट घेऊन नाशिक येथे निघालेला ट्रक (क्र. केए ५६, ३६३९) गुरुवारी रात्री पाचोडकडून जात होता. डेरा फाट्याजवळील वीरभद्रा नदीच्या पुलावरून जाताना समाेरुन भरधाव येणाऱ्या ट्रॅव्हल्सला वाचविण्याच्या प्रयत्नात हा ट्रक पुलाचे कठडे तोडून थेट नदीच्या पाण्यात कोसळला. तुडूंब भरलेल्या नदीत ट्रकचा समोरील भाग बुडाल्याने चालक व वाहक दोघेही संकटात सापडले होते. दोघांनाही पोहता येत नव्हते. जिवाच्या आकांताने त्यांनी कसेबसे केबीनमधून बाहेर पडून आपला जीव वाचविला. यात ट्रकचे प्रचंड नुकसान झाले असून, ३२ टन सिमेंटही खराब झाले. अपघाताची माहिती मिळताच पाचोड ठाण्याचे बीट जमादार किशोर शिंदे, फिरोझ बर्डे, ए. व्ही. काकडे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना मदत केली. या अपघाताची नोंद पाचोड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
अरुंद पुलामुळे अडचणपैठण - पाचोड राज्य महामार्गावरुन दिवसभरात जालना, बुलढाणा, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, मुंबईसह परराज्यातील केरळ, आंध्रप्रदेश, गुजरात, राजस्थान येथील शेकडो अवजड व खाजगी वाहने ये-जा करतात. या रस्त्यावरील वीरभद्रा नदीचे पात्र मोठे असून, यावर अरुंद पूल आहे. यामुळे वर्षभरात येथे चारवेळा अपघात झाला. या पुलाची लांबी, रुंदी वाढवावी, अशी मागणी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी केली आहे.