औरंगाबाद :समृद्धी महामार्गावर सुरक्षेसाठी सुविधा असल्याचा दावा राज्य रस्ते विकास महामंडळाने केले असला तरी सुरक्षा पथके वेळेत पोहोचणे अवघड आहे. सिंदेखड राजापासून पुढे महामार्गाच्या एका पुलावर आयशर ट्रकचे दोन टायर फुटून तो उलटल्याने मंगळवारी शेकडो औरंगाबादकर एक ते दीड तास वाहतुकीच्या कोंडीत अडकले होते. यामध्ये नागपूरहून औरंगाबादकडे येणाऱ्यांचा समावेश होता.
१२० ताशी किमी वेगाने वाहने धावण्याची मुभा समृद्धीवर असल्याने वेगाने वाहने चालविली जात आहेत. त्यामुळे टायर फुटून अपघात होण्याच्या घटना घडत आहेत. आयशर ट्रकमध्ये असलेला लोड आणि गतीमुळे टायर फुटून तो रस्त्यात उलटला. यामुळे महामार्गावर वाहतूक खोळंबली. परिणामी, दोन ते तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा होत्या. क्रेन व सुरक्षा पथके येण्यास वेळ लागल्यामुळे वाहतुकीची काेंडी फुटण्यास उशीर झाल्याचे औरंगाबादेतील नागरिकांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.