छत्रपती संभाजीनगर : महापालिकेतील शाळांचा कायापालट करणे सुरू आहे. त्यासाठी स्मार्ट सिटीतून ६३ कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत. स्मार्ट शाळेसोबत गुणवत्ता वाढविणे, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे हिंदी चित्रपटसृष्टीतील पार्श्वगायक शंकर महादेवन यांची मदत घेतली जाणार आहे. महादेवन विद्यार्थ्यांना गायन, संगीताचे धडे देणार आहेत. मनपा शाळेतील विद्यार्थ्यांचा एक बँड तयार व्हावा, हा त्यामागचा उद्देश आहे.
प्रशासक जी.श्रीकांत यांनी नवीन संकल्पना राबविण्यास सुरुवात केली. शंकर महादेवन संगीत, गायनामध्ये आवड असलेल्या मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देतात. याबद्दलची माहिती घेऊन प्रशासक जी.श्रीकांत यांनी शंकर महादेवन यांच्याशी संपर्क साधून, महापालिकेतील शिक्षकांना संगीताचे धडे देण्याची विनंती केली. महादेवन यांनी ही विनंती मान्य केली. मनपाच्या प्रत्येक शाळेत संगीताचा वर्ग सुरू केला जाणार आहे. त्यासाठी शिक्षकांना संगीताचे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. शिक्षकांना प्रशिक्षण देण्याची तयारी त्यांनी दाखविली असल्याचे जी.श्रीकांत यांनी सांगितले. विद्यार्थ्यांमधील कलागुण ओळखून त्यांना वादक, गायक, संगीतकार तयार करणे, हा त्यामागचा उद्देश आहे. येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून संगीताचे वर्ग सुरू करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येणार आहे. संगीताचे वर्ग सुरू करण्यासाठी लागणारे साहित्य सीएसआर निधीतून खरेदी करण्याची तयारी असल्याचे प्रशासकांनी सांगितले.
शहरात मनपाच्या ७२ शाळामहापालिकेच्या शहरात ७२ शाळा आहेत. १८ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी संख्या आहे. मागील अनेक वर्षांपासून शिक्षण विभागाकडे प्रशासनाने लक्षच दिले नाही. त्यामुळे दरवर्षी विद्यार्थी संख्या झपाट्याने कमी होत होती. आता खासगी शाळांना स्पर्धा देतील, अशा दर्जाच्या शाळा तयार केल्या जात आहेत.