छत्रपती संभाजीनगर : रुग्णालयात युराॅलॉजी विभागात काम करणाऱ्या टेक्निशियनने सोबत काम करणाऱ्या डॉक्टर तरुणीवर सर्जिकल ब्लेडने वार करून हत्येचा प्रयत्न केला. बुधवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास मध्यवर्ती बसस्थानकासमोरील एका हॉटेलमध्ये ही घटना घडली. तरुणीने जखमी अवस्थेत खोलीबाहेर धाव घेतल्याने तिचा जीव वाचला. मात्र, तरुणाने नंतर स्वत:ही आत्महत्येचा प्रयत्न केला. निखिल दादाराव यादव (२५, रा. घनसावंगी, जालना) असे त्याचे नाव असून त्याच्यावर क्रांतीचौक पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
क्रांतीचौक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निखिल व जखमी तरुणी दोघेही गजानन महाराज मंदिर परिसरातील एका मोठ्या रुग्णालयात काम करतात. निखिल युरॉलॉजिस्ट विभागात टेक्निशियन असून जखमी तरुणी निवासी डॉक्टर आहे. २०२३ मध्ये त्यांची एकमेकांची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर नंतर प्रेमात झाले. २०२४ पासून ते नात्यात आहेत. मात्र, काही दिवसांपासून त्यांच्यात बेबनाव निर्माण झाला. इतरांसोबत बोलत असल्याच्या गोष्टीवरून त्याने तरुणीवर संशय घेणे सुरू केले. त्यामुळे तरुणीने त्याच्यापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. निखिलने तरीही सातत्याने तिच्यासेाबत बोलण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला. एक महिन्यापासून निखिल व तरुणी पुन्हा बोलायला लागले होते.
बिघडलेल्या नात्याविषयी बोलण्यासाठी निखिलने पुन्हा तरुणीला भेटण्यासाठी बोलावले. मध्यवर्ती बसस्थानक समोरील एका हॉटेलमध्ये त्याने खोली बुक करून २ वाजेच्या सुमारास ते हॉटेलवर गेले. मात्र, त्यांच्यात पुन्हा वाद पेटले. निखिलने रुग्णालयातील सर्जिकल ब्लेडसोबत नेली होती. त्याने थेट ती काढून तरुणीचा गळा कापण्याचा प्रयत्न केला. तरुणीने मात्र वार चुकवला व तिच्या हातावर चाकूचा वार लागला. ती सावध होऊन थेट खोलीबाहेर पळाली. तिच्या आरडाओरडा ऐकुन हाॅटेलचे कर्मचारी धावून गेले. त्यांनी तिला तत्काळ जवळील रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर निखिलने मात्र स्वत: खोलीत आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी त्याला परावृत्त केले. घटनेची माहिती कळताच क्रांतीचौकचे निरीक्षक सुनील माने, उपनिरीक्षक जगन्नाथ मेंहकुडळे, विकास खटके यांनी धाव घेतली. रात्री उशिरा तरुणीच्या जबाबावरून निखिलवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.