औरंगाबाद : अल्पवयीन मुलीचा वारंवार पाठलाग व बोलण्याचा प्रयत्न करून लग्नाचा तगादा लावणारा अक्षय युवराज गायकवाड (२२, रा. उस्मानपुरा) याला मुलीच्या घरात शिरून, तिचा विनयभंग करत शिवीगाळ केल्याच्या आरोपाखाली अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.एस. निंबाळकर यांनी ५ वर्षे सश्रम कारावास आणि पोक्सोसह विविध कलमांखाली ६ हजार रुपये दंड ठोठावला. पीडितेला नुकसानभरपाईची रक्कम निश्चित करण्यासाठी निकालाची प्रत जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाकडे पाठविण्याचेही आदेशात म्हटले आहे.
याबाबत १७ वर्षांच्या मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी बऱ्याच दिवसांपासून तिचा पाठलाग करून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करीत होता. कधी दारू पिऊन पीडितेच्या घरासमोर उभा राहून तिच्या नावाने आरडाओरड करीत असे. तो गुंड प्रवृत्तीचा व त्याची मोहल्ल्यात दहशत असल्याने पीडितेच्या आई- वडिलांनी पोलिसांत तक्रार देण्यास टाळाटाळ केली होती. आरोपीने मुलीच्या लहान भावाला रस्त्यात गाठून ‘तुझ्या बहिणीला माझ्यासोबत लग्न करण्यास सांग, नाही तर तुला मारून टाकीन’, अशी धमकी दिली होती. त्यानंतर ३० मार्च २०१९ रोजी दुपारी घटना घडली होती.
तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके यांनी गुन्ह्याचा तपास केला होता. सुनावणीवेळी सहायक लोकअभियोक्ता बी.आर. लोया यांनी ५ साक्षीदारांचे जबाब नोंदवले. आरोपीवर यापूर्वी अशाच प्रकारचे २ गुन्हे दाखल असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. पैरवी अधिकारी म्हणून जमादार अश्पाक कादरी यांनी काम पाहिले.