छत्रपती संभाजीनगर : कलेमध्ये प्रचंड ताकद आहे. ही कला पाहतानाच माझे वडील गंभीर आजारातून बरे झाले. महाविद्यालयीन शिक्षण घेताना कधी पायपीट तर कधी रिक्षाने फिरणारा, दुसऱ्या गावाला बसने, रेल्वेने जाणारा योगेश शिरसाठ युवा महोत्सवामुळे आज विमानातून फिरतोय. ही ताकद युवा महोत्सवामुळेच मिळाल्याचे सांगतानाच प्रसिद्ध अभिनेता योगेश शिरसाठ यांना गहिवरून आले. महोत्सवाकडे केवळ जल्लोष, मौजमजा अशा अर्थाने न बघता कलाविष्काराची संधी म्हणून बघण्याचे आवाहन शिरसाठ यांनी केले.
विद्यापीठाच्या युवा महोत्सवाचे उद्घाटन अभिनेते शिरसाठ यांच्या हस्ते सृजन रंगमंचावर झाले. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले होते. यावेळी अभिनेत्री अनुष्का सरकटे यांच्यासह प्रकुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ. भगवान साखळे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. गजानन सानप, डॉ. योगिता हाके पाटील, डॉ. अंकुश कदम, संचालक डॉ. मुस्तजिब खान आदींची उपस्थिती होती. शिरसाठ म्हणाले, ‘संघर्ष’ हाच पाचवीला पुजलेला होता. अशा कुटुंबातून पुढे आलेला माझ्यासारखा तरुण युवक महोत्सवाचा उद्घाटक बनतो, हेच महोत्सवाचे यश आहे. अनेक महोत्सवात केलेला संघर्ष ’एन्जॉय’ केल्याचेही त्यांनी सांगितले. महाविद्यालयीन जीवनात गाण्याची आवड होती. कधी अभिनेत्री होऊ असा विचारही केला नव्हता. आवाजाच्या या देणगीमुळेच मालिका, चित्रपटात कामे मिळत गेली, असे उद्गार अभिनेत्री अनुष्का सरकटे यांनी काढले. प्रास्ताविक डॉ. मुस्तजिब खान यांनी केले. प्रारंभी डॉ. गणेश शिंदे यांनी बनविलेली ध्वनिफित दाखविण्यात आली. संचालन प्रा. पराग हसे यांनी केले.
मराठवाडा कलावंतांची भूमीमराठवाडा ही संतांसह कलावंतांची भूमी आहे. नाट्यशास्त्र विभागाचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष असून अनेक मोठे कलावंत या भूमीत घडले. हा महोत्सव आपणास खूप काही शिकवून जाईल. प्रत्येक माणूस हा कलावंत तर जग हीच रंगभूमी आहे, असे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले अध्यक्षीय समारोपात म्हणाले.
उद्घाटक दोन दिवस रमणार कलावंतांमध्येउद्घाटन अभिनेते योगेश शिरसाठ हे दोन दिवस महोत्सवातील कलाकारांसोबतच रमणार आहेत. शिरसाठ यांनी पाच वर्षे महोत्सवात कलाकार म्हणून भाग घेतलेला असून, सात वर्षे महाविद्यालयाच्या संघाचे नेतृत्व केले. महोत्सवाची १२ वर्षांची तपश्चर्या असल्यामुळे कलावंतांमध्येच रमणार असल्याचेही त्यांनी सांगितले.